शहरातील समस्या सोडविण्यासाठी कार्यवाही सुरु..
⚡मालवण ता.१४-: मालवण शहरातील विविध समस्याबाबत नागरिकांच्या प्राप्त तक्रारीनुसार आमदार निलेश राणे यांनी चार दिवसांपूर्वी मालवण शहरात रात्री फिरून स्पॉट पंचनामा केल्यानंतर मालवण नगरपरिषद प्रशासनाला जाग आली आहे. मच्छिमार्केट येथील कचरा उचल करण्यासाठी दिवसभर कचरा गाडी तैनात करण्यात आली असून कचरा उचल सुरु राहणार आहे. याठिकाणी असलेल्या सेल्फी पॉईंट ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसवली जाणार आहे. या बरोबरच बंदर जेटी येथे बंद असलेले सुलभ शौचालय नागरिक व पर्यटक यांसाठी सुरु करण्यात आले आहे.
मालवण शहरातील बंदर जेटी परिसरातील बंद लाईट व्यवस्था, तेथील प्रसाधन गृहाची झालेली दुरावस्था व पसरलेली दुर्गंधी, तसेच मच्छिमार्केट येथील सेल्फी पॉईंटकडे साठलेला कचरा व दुर्गंधी याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यावर आम. निलेश राणे यांनी रात्रीच्या वेळी पाहणी करत याबाबत उपाययोजना करण्यात न आल्याबाबत नगरपरिषद प्रशासनावर नाराजी व्यक्त करत आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या. मालवण मच्छीमार्केट याठिकाणी असलेल्या सेल्फी पॉइंट ठिकाणी मोठया प्रमाणात कचरा टाकला जात होता. हा कचरा मोकाट कुत्रे, भटकी जनावरे सर्वत्र पसरून टाकत होती. व्यापारी, नागरिक यांना याचा मोठा त्रास होत होता. यां ठिकाणवरून जाणाऱ्या पर्यटकांनाही हे दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य पाहावे लागत होते. मात्र आम. निलेश राणे यांनी केलेल्या पाहणी नंतर नगरपरिषद प्रशासन ऍक्शन मोडवर आले असून हा परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच कचरा गाडी उभी करुन ठेवली जाणार आहे. दिवसातून तीन वेळा त्या गाडीत कचरा भरणा झाल्या नंतर कचरा डपिंग ग्राउंड ला नेवून टाकला जाणार. शेवटची ट्रिप रात्री दहा वाजता असणार आहे. याठिकाणी दिवस रात्र मोठया प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने यावर लक्ष रहावे यासाठी याठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
मालवण बंदर जेटी येथील सुलभ शौचालयाची दुरावस्था, अस्वच्छता घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य याबाबत आमदार निलेश राणे यांच्याकडे नागरिकांनी तक्रार केल्यानंतर त्याठिकाणी तातडीने साफसफाई करुन पे अँड यूझ तत्वावर सुलभ सौचलय सुरु करण्यात आले आहे. तसेच बंदर जेटीवर चांगल्या सोईसुविधा युक्त सुलभ शौचालय उभारणी करण्यात येणार आहे. याबाबत प्रशासनाला आवश्यक तो प्रस्ताव तयार करण्या बाबत सूचना आमदार निलेश राणे यांनी केल्या आहेत. तसेच अन्य समस्या सोडविण्यासाठी देखील कार्यवाही सुरु आहे.
आमदार निलेश राणे यांनी समस्यांची पाहाणी करताच प्रशासनाकडून तात्काळ कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. जनतेच्या मागणीला प्राधान्य, काम करण्याची इच्छा सोबतच प्रशासनावर पकड असली की तात्काळ रिझल्ट मिळतोच हे आमदार निलेश राणे यांनी आमदारकीच्या पहिल्याच महिन्यात मतदारसंघातील अनेक जनहिताच्या समस्या सोडवून दाखवून दिले आहे, असे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी सांगितले.
