देवबाग किनाऱ्यावर होणार ग्रोयन्स बंधारा ; तर मालवण जेटी ते दांडी किनारपट्टीवर बंधारा कम रस्ता होणार…

आम. निलेश राणे यांची मेरीटाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक..

⚡मालवण ता.१२-: कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी मालवणच्या किनारपट्टी भागाच्या विकासासाठी प्रयत्न सुरु केले असून काल महाराष्ट्र सागरी मंडळ (मेरिटाइम बोर्ड) च्या अधिकाऱ्यांसोबत मुंबई येथे घेतलेल्या बैठकीत किनारपट्टीवरील अनेक महत्वाकांक्षी योजनांची संकल्पना मांडण्यात आली. यात देवबाग, तळाशील किनारपट्टीची धूप रोखण्यासाठी तामिळनाडूच्या धर्तीवर अद्यावत ग्रोयन्स बंधारे उभारणे, देवबाग मधील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खाडी किनारपट्टी वरून बंधारा कम रस्ता तयार करून येथील वाहतूक एकेरी मार्गांवरून वळवणे, मालवणच्या पर्यटन वाढीसाठी मालवण जेटी ते दांडी किनारपट्टीवर बंधारा कम रस्त्याचे काम पूर्ण करून मरिन ड्राइव्हच्या धर्तीवर सुशोभीकरण करण्याचे ठरवण्यात आले.

मालवण तालुक्यातील सागरी किनारपट्टीची होणारी धूप हा गेली अनेक वर्षे चिंतेचा विषय बनला आहे. त्यावर कायमस्वरूपी मार्ग काढण्याबरोबरच पर्यटन वाढीसाठी त्याचा उपयोग करून घेण्याचा निर्णय आमदार निलेश राणे यांनी घेतला आहे. त्या अनुषंगाने त्यांनी आज महाराष्ट्र सागरी मंडळ (मेरिटाइम बोर्ड) च्या अधिकाऱ्यांसोबत मुंबई येथे बैठक घेतली. या बैठकीला महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य अभियंता राजाराम गोसावी, अधीक्षक अभियंता श्रीकांत बंगेर, कार्यकारी अभियंता मनीष मेतकर आदी अधिकारी उपस्थित होते.

आमदार निलेश राणे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. देवबाग संगमच्या किनाऱ्यावर ग्रोयन्स बंधारा उभारून समुद्राची धूप कमी करण्यात येणार आहे. तेथून टेट्रॉपॉट बंधारा बांधण्यात येणार आहे. देवबाग मध्ये बॅकवॉटरच्या दिशेने रस्ता कम बंधारा बांधून एकदिशा मार्ग तयार केला जाणार आहे. याठिकाणी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून या रस्त्याचे सुशोभीकरण केले जाणार आहे. देवबाग मध्ये वाहतूक कोंडी होत असल्याने दोन्ही बाजूने एकदिशा मार्ग करून ही समस्या सोडवली जाणार आहे, अशी माहिती आमदार निलेश राणे यांनी दिली. दांडी किनारपट्टीवर पर्यटकांच्या सुविधेसाठी प्रॉमिनाड्स टाकण्यात येणार आहेत. याठिकाणी सुशोभीकरण करून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. येथे रस्ता कम बंधारा होणार आहे, असे ते म्हणाले.

You cannot copy content of this page