⚡मालवण ता.०४-:
मालवण – कसाल या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम बोगस पद्धतीने व नित्कृष्ट दर्जाचे झाले असून रस्ता खड्डेमय होऊन वाहनचालकांना त्रासाला सामोरे जावे लागत असल्याबाबत याबाबत कार्यवाही न झाल्यास या रस्त्यावर डंपर मधून शेण ओतून रस्ता अडवून आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते महेश जुवाटकर यांनी दिल्यानंतर याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदाराला सूचना केल्यावर संबंधित ठेकेदाराने या रस्त्याचे काम येत्या काही दिवसात लवकरच प्राधान्याने केले जाईल असे आश्वासन दिल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विनंतीनुसार महेश जुवाटकर यांनी आपले आंदोलन स्थगित केले आहे.
मालवण – कसाल रस्त्याच्या दुर्देशेबाबत महेश जुवाटकर यांनी मुख्यमंत्री तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग मालवण, मालवण पोलीस निरीक्षक यांना निवेदन पाठवले होते. मालवण- कसाल रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदाराने गतवर्षी नौदल दिनानिमित्त घाई गडबडीने बोगस पध्दतीने काम पुर्ण केले. परंतू वरील रस्त्याचे काम दोन महिने होण्यापुर्वीच खड्डेमय झाला. त्यावेळी सुध्दा स्थानिक राजकीय पक्षाने उठाव केल्यामुळे पुन्हा दोन महिन्याच्या कालावधीत खराब झालेल्या रस्त्याची सुधारणा व डांबरीकरण करण्यात आले. त्यावेळी सुध्दा नित्कृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे पुन्हा जून महिना संपताच दुसऱ्यांदा हा रस्ता खड्डेमय झाला. यामुळे जनतेला त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्या खड्डेमय रस्त्यामुळे बरेचसे अपघात होत आहेत. तरी सुध्दा सार्वजनिक बांधकाम व ठेकेदार दुर्लक्ष करत असल्याने दि. ६ जानेवारी रोजी केव्हाही आनंदव्हाळ ग्रामपंचायत ते गोवेकर बस स्टॉप या दोन्ही ठिकाणी ओले शेण डंपरने ओतून आंदोलन करून रस्ता अडवू, असा इशारा महेश जुवाटकर यांनी दिला होता. याबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवणचे सहायक अभियंता अजित पाटील यांनी संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावत सदर रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरण तात्काळ करावे अशी सूचना दिली. त्यानुसार संबंधित ठेकेदाराने १० ते २० जानेवारी दरम्यान हॉटमिक्स चा प्लांट सुरु होणार असून तो सुरु झाल्यावर या रस्त्याचे काम प्राधान्याने करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. ठेकेदाराने दिलेल्या आश्वासनानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने महेश जुवाटकर यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केल्यावर जुवाटकर यांनी हे आंदोलन स्थगित केले आहे.
