डॉ. विजय नारिंग्रेकर:टोपीवाला हायस्कुलचा ताम्रपट व मानपत्र वितरण सोहळा संपन्न..
⚡मालवण ता.०२-: मातेची ममता आणि शाळेचे अंगण विद्यार्थ्यांना संस्कारमय जीवन जगण्याची भाषा शिकविते. मातेचे आणि शाळेचे ऋण कधीही विसरून चालणार नाही. दातृत्वाची संधी मिळाली तर नेहमीच हात पुढे ठेवावा. आयुष्याच्या उतार वयात आपण कोण होतो? आणि कशामुळे आणि कोणामुळे घडलो? याची जाणीव ठेवल्यास टोपीवाला हायस्कूलच्या आजच्या पिढीला अनेक दिशादर्शक माजी विद्यार्थी मिळतील, असे प्रतिपादन टोपीवाला हायस्कुलचे माजी विद्यार्थी व ताम्रपटाचे मानकरी डॉ. विजय हरिश्चंद्र नारिंग्रेकर यांनी येथे केले.
मालवण येथील अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या ताम्रपट व मानपत्र वितरणाचा समारंभ मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे आज संपन्न झाला. यावेळी डॉ. विजय हरिश्चंद्र नारिंग्रेकर यांना स्व. डॉ. एस. एस. आजगावकर ताम्रपट पुरस्कार तर उद्योजिका सौ. सुरेखा नितीन वाळके व लेफ्टनंट कर्नल स्वप्नील लक्ष्मण केरीपाळे यांना स्व. डॉ. एस. के. पंतवालावलकर मानपत्र मालवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शरद परुळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. केरीपाळे यांचा सन्मान त्यांचे वडील प्रा. लक्ष्मण केरीपाळे यांनी स्विकारला. व्यासपिठावर संस्था सचिव विजय कामत, मुख्याध्यापक लक्ष्मण वळंजू आदी उपस्थित होते. यावेळी प्रशालेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सन्मानाला उत्तर देताना सुरेखा वाळके म्हणाल्या, आयुष्यात मिळालेल्या संधीचे सोने करत पुढे जाण्याने माझा आजपर्यंतचा प्रवास यशस्वी झाला आहे. माझ्या आई वडिलांनी, पती आणि मुलांनीही मला साथ दिल्याने मुंबई सारख्या शहरात मालवणचा झेंडा मजबुत रोवण्याची ताकद निर्माण झाली आहे. आज मला शाळेने जे काही दिले त्यातून मी यशस्वी झालो आहे, यामुळे आज या शाळेकडून मला मानपत्रासाठी निवडण्यात आल्याने मी आनंदी आणि कायम ऋणात राहणार आहे, असेही त्या म्हणाल्या. तर लेफ्टनंट कर्नल स्वप्नील केरीपाळे यांच्यावतीने बोलताना प्रा. लक्ष्मण केरीपाळे म्हणाले, माझा मुलगा स्वप्नील शाळेत असताना त्याला अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी शाळेतील शिक्षक वृंदाने नेहमीच प्रोत्साहन दिले. टोपीवाला हायस्कूल ही एक नुसतीच शाळा नसुन ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी झटणारी माय आहे. शाळेने दिलेल्या शिक्षणाचा उपयोग आज त्याच्या करियरसाठी महत्वाचा ठरला आहे, मला आज स्वप्नील याचे वडील म्हणून सन्मानित करण्यात आल्याने वडील म्हणून मी जी मेहनत घेतली त्याचा सन्मान झाल्याने आज मला आनंद होत आहे. स्वप्नीलच्या यशात त्याची शाळा आणि शाळेतील सर्व शिक्षक आणि मित्रपरिवार यांचाही हातभार आहे, असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात मालवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शरद परुळेकर म्हणाले, मालवण एज्युकेशन सोसायटीचे कामकाज अध्यक्ष म्हणून सांभाळत असताना अनेक यशस्वी निर्णय घेण्यासाठी मला सर्व सहकारी वर्गाने चांगली साथ दिली, यामुळे शाळेची प्रगती होत असताना अनेक नवनवीन उपक्रम आज शाळेत सुरू झाले आहेत. आज शाळेच्यावतीने कार्यक्रमात करण्यात आलेला सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी आणि नेहमीच शाळेच्याप्रती असलेली आत्मीयता दृढ करणारा राहणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाच्या कक्षा वाढवून जगातील शिक्षणाचा उपयोग करून घ्यावा. मुलांना ग्रंथालयांकडे वळून वाचनाची सवय लावली पाहिजे. वाचन संस्कृती अधिक वाढवून मुलांना आपला सर्वांगिण विकास साधावा, असेही ते म्हणाले.
सूत्रसंचालन अस्मिता रावराणे यांनी केले. आभार मुख्याध्यापक लक्ष्मण वळंजू यांनी मानले. यावेळी आजी – माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक उपस्थित होते.
