२३ ला कुडाळ मध्ये तर २४ ला मालवण मध्ये प्रयोग:निर्माते प्रणय तेली, लेखक दिग्दर्शक केदार देसाई यांची माहिती..
⚡कुडाळ ता.२०-: सिंधुसंकल्प निर्मित ‘सिरीयल किलर’ हे नाटक सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर येत आहे. 23 डिसेंबरला कुडाळ मध्ये तर 24 डिसेंबरला मालवण मध्ये या नाटकाचे प्रयोग होणार आहेत. विशेष म्हणजे विनोदी अभिनेते भाऊ कदम यांच्यासह या नाटकाचे निर्माते प्रणय तेली, लेखक आणि दिग्दर्शक केदार देसाई, कलाकार तेजस पिंगुळकर, रुपाली जाधव हे सारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या साऱ्या रंगकर्मींनी एकत्र येत केलेला हा नाट्यप्रयोग सर्वानी पाहावा असे आवाहन नाटकाचे निर्माते प्रणय तेली, लेखक दिग्दर्शक केदार देसाई, कलाकार तेजस पिंगुळकर आणि सिंधू संकल्प संस्थेचे सचिव भूषण तेजम यांनी केले आहे. कुडाळ येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
द सिरीयल किलर या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे या नाटकाची निर्मित कुडाळचे प्रणय तेली आणि त्यांची संस्था सिंधू संकल्प यांनी केली आहे. प्रणय तेली याचे निर्माते आहेत. कुडाळचेच केदार देसाई यांचेच लेखन आणि दिग्दर्शन आहे. कुडाळचाच कलाकार तेजस पिंगुळकर या नाटकात भूमिका करतोय. त्या शिवाय मह्त्वाची मध्यवर्ती भूमिका करणारे भाऊ कदम हे देखील सिंधुदुर्गचे, नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये हे मसुऱ्याचे, नाटकाचा सेट झारापच्या सावंत बंधूनी तयार केला आहे. तर अभिनेत्री रुपाली जाधव हि कोकणातील आहे. असा सारा बहुतांश कोकणचे कलाकार असलेला हा नाट्य प्रयोग जिल्ह्यात होणार आहे. तो येथील प्रेक्षकांनी आवर्जून पाहावा असे आवाहन प्रणय तेली यांनी केले आहे. यावेळी त्यांनी या नाटक निर्मिती मागची संकल्पना, येथील कलाकारांना संधी देण्याचा प्रयत्न, भाऊ कदम यांचे सहकार्य याविषयी विस्ताराने माहिती दिली.
या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग मुंबईत शिवाजी मंदिरला विजयादशमी दिवशी झाला. त्यावेळी खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे आवर्जून हजर होते. या नाटकाचे आणि सिंधुदुर्गचे नाते बघून राणे खुश झाले आणि त्यांनी सर्व कलाकारांच्या पाठीवर शाबासकी थाप दिली. असे प्रणय तेली यांनी सांगितले.
नाटकाचे लेखक दिग्दर्शक केदार देसाई यांनी देखील नाटक बसवतानाची प्रोसेस सविस्तर सांगितली. त्याचबरोबर गेली २५ वर्ष प्रायोगिक रंगभूमीवर रंगकर्मी म्हणून वावरताना पाहिलेले स्वप्न या नाटकाच्या रूपाने साकार होत आहे असे त्यांनी सांगितले. आपल्याच गावात आपलेच नाटक सादर होत असल्याचा आनंद खूप मोठा आहे, असे ते म्हणाले. नाटकातले कलाकार भाऊ कदम यांच्या सारख्या दिग्गज नटासोबत काम करण्याच्या अनुभवाबाबत बोलताना ते म्हणाले कि भाऊ कदम हे पूर्णपणे व्यावसायिक कलाकार आहेत. त्यांनी पूर्ण सहकार्य केले. किंबहुना मुंबईत या नाटकाची रिहर्सल व्हायची तेव्हा भाऊ कदम रिहर्सलला येताना आपल्याला नेहमी फोन करायचे आणि रिहर्सलला यायचे याची आठवण देखील श्री. देसाई यांनी सांगितली.
यावेळी नाटकातले कलाकार तेजस पिंगुळकर यांनी देखील या नाटकातल्या आपल्या अनुभवाबाबत माहिती दिली. केदार देसाई आणि प्रणय तेली यांच्यामुळे व्यावसायिक नाटक करायला मिळाल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले. सिंधू संकल्पचे सचिव भूषण तेजम यांनीदेखील हे नाटक आवर्जून पहा असे आवाहन करताना प्रणय तेली, केदार देसाई आणि सर्व कलाकारांचे कौतुक केले.
सिरीयल किलर या नाटकामध्ये भाऊ कदम, अश्विनी कुलकर्णी, दीपाली जाधव आणि तेजस कदम यांच्या भूमिका आहेत. दि. २२ डिसेंबरला रत्नागिरी, २३ डिसेंबरला बाबा वर्दम स्मृती रंगमंच कुडाळ, २४ डिसेंबरला मामा वरेरकर नाट्यगृह मालवण आणि २५ डिसेंबरला चिपळूण येथे प्रयोग होणार आहेत. या प्रयोगाला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रणय तेली आणि केदार देसाई यांनी केले आहे.
