कुडाळ मध्ये सायबर, अंमली पदार्थ जनजगृती कार्यशाळा:ओटीपी, माहिती शेअर करू नका;श्री. अगरवाल..
⚡कुडाळ ता.१०-: जे बदमाश लोक आहेत, जे प्रॉड लोक आहेत त्यांच्यापासून आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो. आता “डिजिटल अॅरेस्टर” हा पण आजकाल नवीन प्रकार पुढे आला आहे; हा प्रकार एवढा गंभीर आहे की, समोरची व्यक्ती असे भासवतात की ते स्वतःच पोलिस अधिकारी आहेत. सीबीआय, अँटी करप्शनचे अधिकारी आहेत. यामध्ये सुशिक्षित लोक सुद्धा बळी पडू शकतात. त्यामुळे नागरिकांनी सावध होणे काळाची गरज असून कुणीही ओटीपी किंवा व्यक्तिगत माहिती इतरांना शेअर करू नका, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल यांनी केले. सिंधुदुर्ग पोलिसांच्या वतीने कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या सायबर अंमली पदार्थ जन जागृती कार्यशाळेत श्री. अगरवाल बोलत होते. दरम्यान सोमवार दि.१६ डिसेंबर पर्यंत हे अभियान जिल्ह्यात सुरू राहणार आहे.
कुडाळ येथील आरएसएन हाॅल येथे मंगळवारी सायबर अंमली पदार्थ जन जागृती कार्यशाळा
सिंधुदुर्ग पोलीसच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल डॉक्टर रुपेश चौधरी, सिंधुदुर्ग क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक पाटील, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, डॉक्टर रुपेश धुरी आदी उपस्थित होते.
यावेळी श्री.अग्रवाल म्हणाले की, आम्ही सिंधुदुर्ग पोलीस दलातर्फे दि.५ डिसेंबर पासून हे अभियान सुरू केले असून ते सोमवार दि.१६ तारखेपर्यंत तीन विषय घेऊन सुरू ठेवणार आहोत. सध्या आम्ही “सायबर सिक्युरिटी” या विषयावर अधिक लक्ष केंद्रित केला आहे. आपण बघतोय की, आजकाल प्रत्येकाच्या हातामध्ये पुर्वी एक मोबाईल होता, आता प्रत्येकाच्या हातामध्ये दोन-दोन मोबाईल झाले आहेत. लॅपटॉप आहेत, कम्प्युटर पण आहेत. आपल्याकडे इंटरनेटचा आणि मोबाईलचा वापर सुध्दा वाढत आहे, यामध्ये पासवर्ड हॅक होवून त्यातुनच आपली फसवणूक होण्याची शक्यता अधिक आहे. आताच्या टेक्नॉलॉजीने जशी सोय करून दिली आहे, त्यातून धोका सुद्धा अधिक निर्माण झाला आहे. तुम्हाला फसवण्यासाठी अनेक फोन येतील, मी बँकेमधून बोलतोय, तुमचा अकाउंट नंबर द्या असे सांगतील, पण आज काल यापुढे जावूनही डिजिटल अॅरेस्टर हा प्रकार पुढे आला आहे. हा सर्वात गंभीर प्रकार आहे. या प्रकारामध्ये ज्या पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हेगारांना अॅरेस्ट करण्याचा अधिकार आहे ते सुद्धा त्यांना डिजिटल अॅरेस्ट करू शकत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी या सगळ्यांपासून सावध राहावे.अलीकडे गांजा, चरस व इतर रासायनिक पदार्थांच्या अधिन युवकांनी जात आहे, ही सुध्दा फार गंभीर बाब आहे. याबाबत कुणाला माहिती मिळाली तर ती माहिती पोलीसांना देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन श्री.अग्रवाल यांनी केले. सुरज पाटील म्हणाले की, आपला सिंधुदुर्ग जिल्हा आपला जरी लहान असला तरी सायबर क्राईमच्या तावडीतून तो सुटलेला नाही, नशेच्या बाबतीत सुटलेला नाही. म्हणजेच एकंदरीत आपल्याला त्यांच्याविरुद्ध लढायच असेल तर जनजागृती हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि त्या अनुषंगाने आपण या लढाईला सुरुवात केलेली आहे. आपल्या जिल्ह्यात ५०० लोकांना सायबर क्राईमचा फटका बसला आहे. त्यामुळे याबाबत जनजागृती करणे काळजी गरज आहे. आत्ता या जगामध्ये कोण सेफ आहे तर जो इंटरनेट पासून लांब आहे तो सेफ आहे; म्हणजे तुमच्यापैकी असं कोणी सांगू शकते का? की मला इंटरनेटचा धोका नाही आहे म्हणून? कारण प्रत्येकाजवळ मोबाईल आहे, म्हणजे प्रत्येकजण धोक्याखाली आहे. त्यामुळे यापुढे आली लिंक केलं क्लिक असं करू नका.कोणताही मोबाईल कोणताही लॅपटॉप हा जर नेटवर्क मध्ये आला तर तो हॅक होऊ शकतो. आताच युग हे सायबर युग आहे. सगळ्यांमध्ये इंटरनेटचा वापर आहे. काही ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर अधिकृत ॲपवरच ऑर्डर करा. उगाच कुठेही ऑनलाईनवर ऑर्डर करू नका तसं केल्यास तुमचा फोन हॅक होवू शकतो. कितीही झालं तरी लिंक ओपन करुन एपीके फाईल डाऊनलोड करु नये. पूर्वी ओटीपीची पध्दत होती आता ओटीपी आवश्यक नाही. अंकामधील पासवर्ड हॅकर्स शोधतात म्हणून अक्षरे ठेवून स्ट्रॉंग पासवर्ड तयार करा असे आवाहन सुरज पाटील यांनी केले. यावेळी डॉ.रूपेश धुरी यांनी सुध्दा कार्यशाळेत मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला विद्यार्थी, पोलीस पाटील, बचत गटाच्या महिला, उमेदच्या महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे निवेदन अविनाश वालावलकर करुन शेवटी आभार मानले.
कुडाळ पोलीस निरीक्षकांचे एसपींनी केलं कौतुक!
आता वाढत्या टेक्नॉलॉजीत सायबर क्राईम हा विषय वाढत चालला आहे त्यातच डिजिटल अरेस्टर हा विषय गंभीर बनला आहे, त्यामुळे लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यात जवळपास २५ ते ३० हजार लोकांपर्यंत हा उपक्रम नेण्याचा आमचा प्रयत्न आहे.
कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी या उपक्रमाचे नियोजन चांगल्या प्रकारे केले असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी सांगून त्यांचे खास कौतुक केले.
