जिल्ह्यातील शिवसेना मजबूत करण्यासाठी गाव तिथे शाखा उपक्रम राबविणार…

दत्ता सामंत:जनता व मतदार त्यातून बहुमताने आलेल्या नावाच्या व्यक्तीला शाखाप्रमुख बनविले जाईल…

⚡मालवण ता.०९-: विधानसभा निवडणुकीनंतर आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना पक्ष संघटना मजबूत करण्यात येणार आहे. यासाठी ‘गाव तिथे शिवसेना शाखा’ हा उपक्रम राबविण्यात येणार असून लवकरच गावागावात बैठका घेऊन त्याठिकाणी शिवसेना शाखा स्थापन करून शाखाप्रमुखांसह विभाग प्रमुख व इतर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी कुंभारमाठ येथील आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई, संतोष साटविलकर, दीपक पाटकर, मंदार लुडबे, जयप्रकाश परुळेकर, राजन माणगावकर, सुशांत घाडीगावकर, संतोष कोदे, संदीप भोजने, संतोष मिराशी, दादा नाईक, गोविंद चव्हाण, बाळा राऊत, प्रशांत पडवळ, काशिनाथ चव्हाण, गणेश चव्हाण, संजय ठाकूर, बाबू परब, पुरुषोत्तम शिंगरे, सूर्यकांत चव्हाण, विजय चव्हाण आदी व इतर उपस्थित होते.

यावेळी दत्ता सामंत म्हणाले, आपण शिवसेनेचा जिल्हाप्रमुख म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर या कालावधीत विधानसभा निवडणूक झाली. या निवडणुकीत जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आले. यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. सर्व मतदारांचे आपण आभारी आहोत. महायुतीची सत्ता आल्याने प्रत्येक मतदार संघातील महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. जिल्ह्यातील पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने गावागावात शाखा निर्माण करण्यात येणार आहे. गावागावात बैठक घेऊन कार्यकर्ते जनता व मतदार त्यातून बहुमताने आलेल्या नावाच्या व्यक्तीला शाखाप्रमुख बनविले जाईल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या शिकवणीनुसार आम्ही काम करणार आहोत. खासदार नारायण राणे यांनीही बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसारच जिल्ह्यात काम केले आहे. नव्वद च्या दशकात सिंधुदुर्गात आल्यावर नारायण राणे यांनी अनेक कार्यकर्ते घडविले. मी देखील राणेंच्या मार्गदर्शनाखाली घडलेला कार्यकर्ता आहे. समाजात कसे वागावे, कसे बोलावे याचे बाळकडू राणेनी आम्हाला दिले आहे. त्याच पद्धतीने आम्ही काम करत राहणार आहोत. शिवसेना कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधी किंवा पदाधिकारी म्हणून न वावरता आपण जनतेचे सेवक आहोत या भूमिकेतून जनतेची सेवा करावी, असेही दत्ता सामंत म्हणाले.

दत्ता सामंत पुढे म्हणाले, मालवण कुडाळ मतदार संघाला नारायण राणे यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले होते. या मतदार संघात राणेनी विविध पायाभूत सुविधा निर्माण केल्या. मात्र २०१४ ते २०२४ या दहा वर्षाच्या काळात माजी आमदार वैभव नाईक यांनी येथील रस्त्यांचे नूतनीकरण केले नाही. विकास कामे करण्यात ते अपयशी ठरले. नारायण राणे यांनी निर्माण केलेल्या पायाभूत सुविधा दुरुस्त करण्यासाठी दोन वर्षाचा काळ जाईल, मात्र आता येत्या दहा वर्षाच्या काळात आमदार निलेश राणे येथील विकास कामांसाठी जास्तीत जास्त निधी आणतील, त्यामुळे या कामांना जास्त वेळ लागणार नाही. आम. निलेश राणे तळागाळात पोहोचून सर्वसामान्यांची विचारपूस करतात. निलेश राणे हे उच्चशिक्षित अभ्यासू आमदार म्हणून ओळखले जातील. आम्हांला आम. निलेश राणे यांची ताकद मिळाली असून मतदारांच्या आशीर्वादांना आम्ही तडा जाऊ देणार नाही, असेही दत्ता सामंत म्हणाले.

You cannot copy content of this page