बांदा/प्रतिनिधी
येथील नट वाचनालयात आयोजित करण्यात आलेल्या शालेय नाडकर्णी वक्तृत्व स्पर्धेला स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत पाचवी ते सातवी या लहान गटात दुर्वा नाटेकर (जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नं. १) तर आठवी ते दहावी या मोठ्या गटात प्रज्ञा मोर्ये (खेमराज हायस्कुल, बांदा) यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
(कै.) शशिकांत शांताराम नाडकर्णी यांनी आपले वडील (कै.) शांताराम कमळाजी नाडकर्णी व आई (कै.) शांताबाई शांताराम नाडकर्णी यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा पुरस्कृत केली आहे. स्पर्धेचे हे विसावे वर्ष आहे. प्राथमिक गटासाठी ‘भारतीय सण व संस्कृती’, ‘माझा आवडता संशोधक – डॉ. होमी भाभा’ हे विषय तर माध्यमिक गटासाठी ‘साहित्यिक जयवंत दळवी’, ‘थोर उद्योजक – रतन टाटा’ हे विषय देण्यात आले होते.
पाचवी ते सातवी गटात प्रणिता सावंत (नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली), मैथिली सावंत (नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविले. या गटात सानवी देसाई (खेमराज हायस्कुल, बांदा), समृद्धी देसाई (माध्यमिक विद्यालय, डेगवे) यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला. आठवी ते दहावी गटात मिताली कोठावळे (नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली), आर्या सावंत (नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.
तत्पूर्वी स्पर्धेचे उदघाटन वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व नाडकर्णी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संपन्न झाले. यावेळी उपाध्यक्ष निलेश मोरजकर, कार्यवाह राकेश केसरकर, संचालक शंकर नार्वेकर, प्रकाश पाणदरे, परीक्षक चंद्रकांत सावंत, अनंत भाटे, अंकुश माजगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश केसरकर यांनी करून उपस्थितांचे आभार मानले. यावेळी गुरुनाथ नार्वेकर, सहकार्यवाह हेमंत मोर्ये, संचालिका सौ. स्वप्नीता सावंत, ग्रंथपाल सुस्मिता नाईक, सहाय्यक ग्रंथपाल सुनील नातू, ओंकार राऊळ, अमिता परब, पालक, शिक्षक उपस्थित होते.
नट वाचनालयात आयोजित शालेय नाडकर्णी वक्तृत्व स्पर्धेला स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद…
