गावकऱ्यांच्या सहकार्यातून झरेबांबर तिठा झाला निर्धोक….!

राजेंद्र म्हापसेकरांचा पुढाकार ; दोन दिवसांपूर्वी घडला होता अपघात..

⚡दोडामार्ग ता.०८-: झरेबांबर तिठा येथे अपघातास कारणीभूत ठरणारे अडथळे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर व ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत बाजूला करून हा रस्ता वाहतुकीस निर्धोक केला.दोन दिवसांपूर्वीच इथे अपघात होऊन मांगेली देऊळवाडी येथील आठ वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाला होता.त्यामुळे ग्रामस्थांनि घेतलेल्या भूमिकेचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. दोडामार्ग – विजघर राज्यमार्गावर झरेबांबर तिठा लागतो.दोडामार्ग व भेडशी यांच्या मधोमध मध्यवर्ती हे ठिकाण असल्याने आणि येथून पुढे रस्ता तिलारी व उजवीकडून उसप , खोक्रल , पिकुळे गावात जात असल्याने नेहमीच इथे लोकांची गर्दी असते.शिवाय तिलारी धरणामुळे विस्थापित झालेल्या पुनर्वसन गावठाणवासीयांची बाजारपेठही याच ठिकाणी असल्याने हा तिठा नेहमीच गजबजलेला असतो.दोन दिवसांपूर्वी याच तिठ्यावर रस्ता ओलांडत असताना भाजी वाहतूक करणाऱ्या टेम्पोने ठोकरल्याने आठ वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाला.त्यानंतर लागलीच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर व ग्रामस्थांनी शासकीय यंत्रणेची वाट न पाहता भविष्यात आणखिन अपघात होऊन कोणाचा जीव जाऊ नये यासाठी येथे वाहतुकीस निर्माण ठरलेले अडथळे स्वतःहून बाजूला करून वाहतूक निर्धोक केली. जेसीबीच्या सहाय्याने आवश्यक तेथे मातीचा भराव टाकून रस्त्याच्या बाजूची साईडपट्टी सुस्थितीत करण्यात आली.शिवाय आजूबाजूची झाडीही साफ केली.तर जी भाजीची दुकाने रस्त्याच्या कडेला होती ती थोडी मागे सरकवून घेण्यात आली.यावेळी व्यापाऱ्यांनीही सहकार्याची भूमिका घेत स्वतः या श्रमदानात सहभाग घेतला.शासकीय यंत्रणांची वाट न पाहत बसता हा येथून वाहतुक निर्धोक व्हावी यासाठी सिहांचा वाटा उचलणारे श्री.म्हापसेकर व ग्रामस्थांच्या भूमिकेचे तालुक्यातून स्वागत केले जात आहे.यावेळी सरगवे गावचे माजी सरपंच अंकुश कवीटकर , श्रीधर सावंत ,आनंद डावरे ,ललित पवार ,श्री.गवस यांच्यासह ग्रामस्थ या श्रमदानात सहभागी झाले होते. चौकट – मृताच्या नातेवाईकांना मिळवून दिली सात लाखांची मदत – दोन दिवसांपूर्वी याच ठिकाणी अपघात होऊन मांगेली देउळवाडी येथील आठ वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला होता.त्यावेळी तिच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई द्यावी यासाठी राजेंद्र म्हापसेकर व तालुक्यातील नागरिक आणि पुनर्वसन गावठाणातिल नागरिकांनी आग्रही भूमिका घेतली आणि त्या टेम्पोमालकास सात लाखांची नुकसानभरपाई मदत म्हणून मयताच्या नातेवाईकांना धनादेशाच्या रुपात देण्यास भाग पाडले .

You cannot copy content of this page