संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. स्मिता सुरवसे…

कुडाळ : येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या नूतन प्राचार्या म्हणून नुकतीच डॉ. स्मिता लक्ष्मण सुरवसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. सुरवसे या मुंबई येथील के.जे. सोमय्या विद्याविहार येथे पदार्थ विज्ञान विभागामध्ये प्राध्यापक म्हणून तसेच शैक्षणिक विभागाच्या अधिष्ठाता म्हणून कार्यरत होत्या.
त्या मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील असून जिल्हा मलेरिया अधिकारी म्हणून निवृत्त झालेल्या कै. शांताराम सावंत यांच्या सुकन्या आहेत.
श्री पंचम खेमराज महाविद्यालयामधून त्यांनी पदार्थ विज्ञान विषयात पदवी संपादन केल्यानंतर मुंबई विद्यापीठामधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. मुंबई विद्यापीठाची त्यांनी पीएचडी पदवी संपादन केली असून त्या सेट उत्तीर्ण आहेत. डॉ. स्मिता सुरवसे यांनी आपल्या अध्यापन कार्याची सुरुवात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच श्री पंचम खेमराज महाविद्यालयामधून केली. 1992 ते 1995 पर्यंत श्री पंचम खेमराज महाविद्यालय येथे त्यानंतर देवगड येथील स.ह. केळकर महाविद्यालय येथे 1995 ते 2006 या काळात त्यांनी अध्यापन कार्य केले. 2006 मध्ये त्या मुंबईच्या के. जे. सोमय्या महाविद्यालयामध्ये रुजू झाल्या. ऑक्टोबर 2024 पर्यंत त्या तेथे कार्यरत होत्या.
आपल्या अध्यापनाच्या कार्यकाळात त्यांनी संशोधन क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांचे एकूण सात संशोधन प्रकल्प पूर्ण झाले असून आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकामधून त्यांचे वीसहून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. तीसहून अधिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदांमधून त्यांनी शोधनिबंध सादर केले आहेत. 2015 मध्ये त्यांनी विदेशात क्रोएशिया येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेमध्ये शोधनिबंध सादर केला आहे. 2021 मध्ये भरलेल्या तिसऱ्या एचइएफ आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सर्वोत्कृष्ट ठरलेल्या पहिल्या पाच शोधनिबंधात त्यांच्या शोधनिबंधाचा समावेश होता. संशोधन क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या डॉ स्मिता सुरवसे यांना लक्षवेधी प्राध्यापक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
के.जे. सोमय्या महाविद्यालयामध्ये अध्यापन आणि प्रशासनाचा त्यांना दीर्घ अनुभव आहे. नॅनो टेक्नॉलॉजी आणि नॅनो सायन्स या विषयावरील अभ्यासक्रमांची निर्मितीही त्यांनी केली आहे. विविध विज्ञान विषयक परिषदा, स्पर्धा यामध्ये विषयतज्ज्ञ म्हणून त्यांचा सहभाग असतो. याशिवाय एम. टी. एस. तसेच यशदा तर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या समन्वयक म्हणून, निवडणूक अधिकारी म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे.
संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाचा कार्यभार त्यांनी दिनांक 25 ऑक्टोबर 24 पासून स्वीकारला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील त्या पहिल्या महिला प्राचार्य आहेत. त्यांच्या नियुक्ती बद्दल कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी यांनी त्यांचे स्वागत आणि अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page