⚡मालवण ता.०४-: मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विभागामार्फत एनसीसी डे साजरा करण्यात आला. यावेळी एनसीसीमधून सरकारी नोकरीस लागलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच विविध कार्यक्रम संपन्न झाले.
एनसीसी डे कार्यक्रमात प्रारंभी ईशस्तवन करण्यात आल्यानंतर सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांच्या हस्ते एनसीसी झेंडावंदन करण्यात आले. प्राचार्य डॉ. ठाकूर यांनी एनसीसी दिनानिमित्त मार्गदर्शन करत एनसीसीचे महत्व काय आहे, एनसीसी मधून निर्माण होणाऱ्या संधी, सिंधुदुर्ग कॉलेजची एनसीसी जिल्ह्यात व इतर जिल्ह्यांमध्ये कशाप्रकारे नावाजली गेली, यासंबंधी माहिती दिली.
यावेळी एनसीसी पूर्ण करून आता सरकारी नोकरीमध्ये रुजू झालेल्या कोतवाल व मालवण तहसीलमधील महसूल सेवक स्नेहल ढोके, मालवण तहसील मधील सहाय्यक करण मांजरेकर, महसूल सेवक राहुल चव्हाण या माजी विद्यार्थ्यांचा प्राचार्य ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मालवण मधील अतिथी बांबू हॉटेलचे मालक संजय गावडे यांनी जे विद्यार्थी काम करून शिक्षण घेत आहेत, दिवस-रात्र मेहनत करतात अशा कष्टाळू एनसीसी विद्यार्थिनींना दोन सायकल बक्षीस म्हणून दिल्या, त्याचेही वितरण प्राचार्य व संजय गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. संजय गावडे यांनी आपल्या भाषणातून जे विद्यार्थी घरचा खर्च भागवण्यासाठी मिळेल ते काम करून शिक्षण घेत असतात अशा विद्यार्थ्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे आणि यादृष्टीने मी हा सन्मान करीत आहे, असे सांगितले.
यावेळी फुग्यांच्या माध्यमातून एनसीसी लोगो तयार करण्यात आला. तसेच एनसीसी नावाचा केक कापण्यात आला. यानंतर एनसीसी गीत म्हणून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे कमांडिंग सीनियर मनाली पालव या विद्यार्थिनीने केले. त्याचबरोबर ट्रूप कमांडर कमांडिंग सीनियर राहुल जाधव, सिद्धी मराठे, वैभव पाताडे , दर्पणा जाधव या सीनियरनी केले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत यांनी केले. यावेळी सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे व रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, एनसीसी चे सर्व विद्यार्थी, इतर विद्यार्थी उपस्थित होते.
