*मत्स्य विभागाच्या शीतल नौकेने केला पाठलाग; देवगड समुद्रातील घटना*
देवगड : प्रतिनिधी
मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्तीनौकेने परप्रांतीय नौकांवर कारवाई करण्यासाठी भर समुद्रात केलेला थरारक पाठलाग, पोलिस कर्मचाऱ्यानी प्रसंगी पिस्तूल रोखून परप्रांतीय नौकेला अडविण्यासाठी केलेला प्रयत्न व मत्स्यव्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी, गस्ती नौकेचे तांडेल, सागरसुरक्षारक्षक यांनी दाखविलेले धाडस या थरारक प्रसंगातुन मत्स्यव्यवसाय विभागाच्या शीतल गस्तीनौकेने देवगड तारामुंबरी – मिठमुंबरी समोर समुद्रात १९ वावामध्ये उडपी कर्नाटक येथील परप्रांतीय हायस्पीड नौकेला जेरबंद केले. ही कारवाई आज शनिवारी सकाळी ८.३० वा.सुमारास करण्यात आली.या मोहिमेमध्ये मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी रवींद्र मालवणकर, पो.कॉ.निलेश पाटील, सागरसुरक्षा रक्षक संदेश नारकर, हरेश्वर खवळे, धाकोजी खवळे, संतोष ठुकरूल, योगेश फाटक, अमित बांदकर, गस्ती नौकेचे तांडेल श्री.हरचकर, श्री. चदरकर सहभागी झाले होते.
याबाबत मत्स्यव्यवसाय विभागाकडून मिळालेल्या माहितीनूसार, समुद्रात परप्रांतीय नौेकांची ग्रुपने धुडगुस सुरू असून यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाच्या शीतल गस्ती नौकेने कारवाई मोहिम राबवित असताना देवगड तारामुंबरी मिठमुंबरी समुद्रात १९ वावामध्ये परप्रांतीय हायस्पीड नौका महाराष्ट्र सागरी जलधी क्षेत्रात मच्छिमारी करताना निदर्शनास आल्या.हायस्पीड नौका प्रतिबंधीत क्षेत्रात मच्छिमारी करत असल्याने मत्स्यव्यवसाय विभागाच्या शीतल नौकेने कारवाई करण्यासाठी त्या नौकांच्या दिशेने पाठलाग केली मात्र बहुतांशी नौकांनी पलायन केले तर उडपी येथील जयमाता ही नौका त्या दरम्यान जाळे टाकून मच्छिमारी करीत असताना मत्स्यव्यवसाय विभागाच्या शीतल नौकेने त्या नौकेचा दिशेने जाण्यास सुरूवात केली.दरम्यान जयमाता नौकेवरील खलाशांनी पाण्यात टाकलेले जाळे तोडून टाकून पलायन करण्याचा प्रयत्न केला.
परप्रांतीय जयमाता या हायस्पीड नौकेचा वेग जास्त असल्याने शीतल नौकेला तिचा थरारक पाठलाग करावा लागला.यावेळी शीतल नौकेचे तांडेल हरचकर आणि चदरकर यांनीही आपल्या नौकेचा वेग वाढवून हायस्पीड नौकेला गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र जयमाता नौकेनेही हुलकावणी देत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. हा चित्तथरारक प्रसंग अर्धा ते पाऊण तास सुरू होता. या नौकेवरील तांडेल तसेच सर्व सागरसुरक्षा रक्षक यांनी परप्रांतीय नौकेला अडविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. शीतल नौेकेवर कार्यरत असलेले देवगड पोलिस स्टेशनचे पालिस कॉन्स्टेबल निलेश पाटील यांना शेवटी पिस्तूल रोखावे लागेल. दरम्यान मत्स्यव्यवसाय विभागाच्या शीतल नौकेला अखेर परप्रांतीय नौका जयमाता हिला रोखण्यात यश आले.
यावेळी जीवाची पर्वा न करता शीतल नौकेवरील सर्व सागरसुरक्षा रक्षक, पोलिस कॉन्स्टेबल निलेश पाटील यांनी जयमाता नौकेवर उड्या टाकून प्रथम त्या नौकेवरील तांडेल नागराज नागप्पा हरीकांत व त्याच्याबरोबर असलेल्या ६ सहकाऱ्यांना पकडले. त्यांच्याजवळील मोबाईल, वायरलेस यंत्रणाही ताब्यात घेतली व नौकेचे स्टेअरींग ताब्यात घेवून नौका देवगड बंदरात आणून स्थानबध्द करण्यात आली.जयमाता ही नौका उडपी कर्नाटक येथील प्रजना यांच्या मालकीची असून महाराष्ट्र सागरी जलधी क्षेत्रात विनापरवाना मच्छिमारी करताना कलम ७ चा भंग केल्याप्रकरणी तसेच कमी आसाचे जाळे वापरून प्रतिबंधीत क्षेत्रात मच्छिमारी करीत असल्याप्रकरणी महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम १९८१ अंतर्गत कारवाई केली असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी रवींद्र मालवणकर यांनी दिली आहे.
