पंधरा वर्षे तुम्ही जसं हसत खेळत निवडून दिलं तसंच हसत खेळत त्याचा निरोप समारंभ करा…

विशाल परब यांचा टोला: मला एकदाच संधी द्या; या मतदारसंघाची परिस्थिती बदलतो..

⚡सावंतवाडी ता.१४-: गेली पंधरा वर्षे तुम्ही त्यांना जसं हसत खेळत निवडून दिल तसंच त्यांना आता तुमच्या गावात आले की काय बोलतात ते ऐकून घ्या. त्यांचा चांगला पाहुणचार करा व हसत खेळत त्यांचा निरोप समारंभ करा, असा टोला अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी नाव न घेता मंत्री केसरकर यांना लगावला. दरम्यान आज गावात नेटवर्कच्या समस्या आहेत. रोजगाराच्या समस्या आहेत. उद्योगधंदे नाहीत, मात्र तीन वेळा निवडून देऊन सुद्धा काय होत नसेल तर आपण आता परिवर्तन करण्याची गरज आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी आता एकजूट दाखवून हा बदल घडवून आणा. मी तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. मतदारसंघाची झालेली परिस्थिती मी बदलून तुम्हाला दाखवणार असं शब्दही त्यांनी यावेळी उपस्थित ग्रामस्थांना दिला. श्री परब तळवणे येथे बोलत होते.

श्री परब पुढे म्हणाले, मी कोणावर टीका टिपणी करत नाही. मला आवडतही नाही. मी आज या मतदार संघाची परिस्थिती बदलण्यासाठी मतदारसंघात निवडणुकीसाठी उभा राहिलो आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी मला एकदा संधी द्या. पुढील पाच वर्षात मी या मतदारसंघात काहीतरी करून दाखवणार. हा माझा तुम्हाला शब्द आहे. त्यामुळे सगळ्यांनी आता एकच निश्चय करा की यावेळीचा आमदार हा विशाल परबच हवाय. आता कोणी येऊन तुम्हाला कोणीही आमिष दाखवतील. शेवटच्या चार दिवसात तुमच्या घराच्या दरवाज्याची कडी वाजवतील. पण तुम्ही त्यांचा चांगला पाहुणचार करून त्यांचा चांगला निरोप समारंभ करा, असा टोला त्यांनी यावेळी नाव न घेता केसरकर यांना हाणला.

You cannot copy content of this page