सी वर्ल्ड, रिफायनरीला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरेंना घरी बसवा…

प्रमोद जठार:सहाही आमदार महायुतीचेच निवडून येणार..

कणकवली : ज्याला रिफायनरी नको, समृद्धी महामार्ग नको, सी वर्ल्ड प्रकल्प नको, कुठलाच विकास प्रकल्‍प नको अशा उद्धव ठाकरे यांना आता जनतेने घरी बसविण्याची वेळ आली आहे. त्‍यामुळे चिपळूण ते सावंतवाडीपर्यंतच्या सहाही मतदारसंघात महायुतीचेच आमदार निवडून येणार असा विश्‍वास माजी आमदार आणि भाजप संघटक समन्वयक प्रमोद जठार यांनी येथे व्यक्‍त केला. येथील प्रहार भवन येथे श्री.जठार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्‍यांच्यासोबत माजी नगरसेवक शिशिर परुळेकर, सरपंच रवींद्र शेट्ये उपस्थित होते. प्रमोद जठार म्‍हणाले की, शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना कुठलाच विकास प्रकल्‍प नको आहे. त्‍यामुळे त्‍यांनी सी वर्ल्ड प्रकल्‍पाला विरोध केला. रिफायनरी प्रकल्‍पाच्या फाईलवर सही केली. पण नंतर अधिकाऱ्यांनी मला फसवले असे सांगून या प्रकल्‍पाला विरोध केला. त्‍यामुळे हजारो रोजगार संधी वाया गेल्‍या. आता लोकसभेत भाजपचं सरकार आलंय. विधानसभेतही त्‍याची पुनरावृत्ती होईल. त्‍यानंतर रिफायनरी प्रकल्‍प निश्‍चितपणे मार्गी लागेल आणि विकासाचा बॅकलाॅग भरून येईल. महायुती चे राजापूर विधानसभेचे उमेदवार किरण सामंत यांनी ग्रीन रिफायनरी विषयच बंद झाला असल्याचे म्हटले आहे, त्याऐवजी पर्यावरण पूरक दोन प्रकल्प आणत असल्याचे जाहीर करत नाणार ग्रीन रिफायनरी ला विरोध जाहीर केला. त्याबाबत बोलताना जठार म्हणाले की सामंत यांनी पर्यावरण पूरक प्रकल्प आणावेच. पण रिफायनरी हा उद्योग केवळ राजापूर समुद्र किनाऱ्यापुरता नाहीय तर संपूर्ण कोकण किनारपट्टीच्या विकासासाठी आवश्‍यक आहे. समुद्र किनारा फक्‍त भैया सामंत यांच्या मतदारसंघापुरता मर्यादीत नाही. त्‍यामुळे बारसू नसेल तर नाणार किंवा ज्‍या ठिकाणी जागा उपलब्‍ध होईल त्‍या किनारपट्टीलगतच निश्‍चितपणे हा प्रकल्‍प होणार आहे. नाणार मुळे कोकणातील बंदर विकासाला मोठी चालना मिळणार आहे आणि बंदरे विकसित झाली तरच कोकणचा सर्वांगिण विकास होणार आहे. जठार पुढे म्हणाले की, शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात ३१८ क्रमांकाच्या पानावर उल्लेख केलाय की, अडीच वर्षे मुख्यमंत्री असूनही उद्धव ठाकरे हे दोन दिवसही मंत्रालयात गेले नाहीत, ही चिंतेची बाब आहे. खुद्द शरद पवार यांनीच उद्धव ठाकरेंची क्षमता किती कमी आहे हे सांगितलं आहे. त्‍यामुळेच आताच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्‍हणून त्‍यांनी ठाकरेंना पुढे येऊ दिलेलं नाही. खरं तर उद्धव ठाकरेंना स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कायम आपल्या भाषणाची सुरुवात तमाम हिंदू बांधवांनो अशी करत. पण उद्धव ठाकरे भाषणाची सुरुवात महाराष्ट्र प्रेमी म्हणून करतात. त्‍यामुळे ‘‘हम सब एक है तो सेफ है आणि उद्धव ठाकरे फेक है’’ हे संपूर्ण महाराष्‍ट्राला कळून चुकलं आहे.

You cannot copy content of this page