परशुराम उपरकर:निष्ठेच्या गोष्टी राणेंनी करू नये..
कुडाळ : भाजपचे खासदार नारायण राणे यांनी सन २००५ मधील आपले शब्द आठवावेत. आपण सिंधुदुर्गातील शिवसेना औषधालाही ठेवणार नाही. तसेच धनुष्यबाणही शिल्लक ठेवणार नाही असे सांगितले होते. त्याच नारायण राणेंना नियतीने, परशुरामाच्या भुमीने परत धनुष्यबाण हातात घ्यायला लावला, तो सुध्दा चोरलेला धनुष्यबाण हाती घ्यायला लावला हे राणेंनी ध्यानात ठेवावे. आता भाजपचे खासदार नारायण राणे आपला मुलगा निलेश राणे यांना शिंदे शिवसेनेतून उभे करून भाजप संपविण्याचे काम करत असल्याची टिका माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली.
कुडाळ येथील उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यालयात आज परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, संतोष शिरसाट आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. उपरकर म्हणाले की, भाजपचे नेते खासदर नारायण राणे हे शिंदेची शिवसेना वाढविण्याचे काम करत आहेत. एका बाजुने भाजपचे देंवेद्र फडणवीस व आमदार प्रसाद लाड माहिमच्या मतदार संघामध्ये आम्ही भारतीय जनता पक्ष अमित ठाकरे यांना मदत करणार असे सांगत आहेत. पण भाजपचे खासदार नारायण राणे मात्र आपल्याला शिंदेची शिवसेना वाढवायची आहे म्हणून शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांना मदत करणार असे सांगत आहेत. म्हणजेच राणेंनी आपण भाजपपेक्षा शिंदेची शिवसेना वाढवत असल्याचे जाहिर केले आहे.
नारायण राणे अडिच वर्ष केंद्रिय मंत्री होते. अडिच वर्ष महायुतीची सत्ता राज्यात होती. असे असताना मालवण बसस्टॅण्ड येथे छोटेसे शौचालय राणेंना का बांधता आले नाही? त्यासाठी सुध्दा आ. वैभव नाईक यांच्याकडे तुम्हाला बोट दाखवावे लागत आहे. वैभव नाईक यांनी या जिल्ह्यातील प्रत्येक गावात, प्रत्येक ठिकाणी आपापल्या माध्यमातून काम केलेली आहेत. आपल्या मुलाचे काम काय आहे? किंवा आपला मुलगा पाच वर्ष खासदारकीच्या काळात किती गाव फिरला? कोणत्या गावात भेटी दिल्या? कोणत्या नागरीकांना मदत केली? कोणत्या रूग्णांना खासदारांच्या 10 टक्क्यातून जो बेड मिळतो, त्या बेडसाठी पत्र दिले किंवा मुलगा खासदार असताना त्याने जिल्हा नियोजनची बैठक घेतली का? बॅकेंची मिटींग कधी घेतली? किंवा केंद्रिय निधीसाठी बैठका कधी घेतल्या? अशा बैठकांना ते कधी उपस्थित राहीले? ते नारायण राणेंनी सांगावे, फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा नियोजनच्या मिटिंगमध्ये केवळ वडील पालकमंत्री असल्यामुळे जिल्हा नियोजनच्या मिटिंगला ते येत होते, पण तोंडावर बोट ठेवून गप्प बसत होते, मात्र पलिकडे लगत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात भास्कर जाधव मंत्री असताना त्या ठिकाणच्या जिल्हा नियोजनच्या बैठकींना निलेश राणे कधीही उपस्थित राहिले नाहीत. अशांना विकासाची काय व्याख्या समजणार? त्यामुळे नारायण राणे आपल्या मुलासाठी जेवढे काही सांगायला जातील तेवढे अधिक आमच्याकडे विषय आहेत.
नारायण राणेंच्या मुलाला विकास हा समजलेलाच नाही. म्हणून निलेश राणेंना उभे करून भारतीय जनता पक्ष संपविण्याचा विडा घेतलेला आहे, हे सर्वांना ज्ञात आहे. त्यामुळे राणेंनी फक्त आपल्या मुलाबाबतच सांगावे, दुसर्याच्या निष्ठेबद्दल बोलू नये. आम्हाला हे ही माहित आहे की, मुख्यमंत्र्यांना तुम्ही शब्द दिला आहात की, सिंधुदुर्गची भारतीय जनता पार्टी संपवून शिंदे शिवसेना वाढवून देतो, हा शब्द मुख्यमंत्र्यांना दिला असल्यामुळे शिदेंनी तुमच्या मुलाला प्रवेश दिलेला आहे, हे सर्वांना माहित आहे. नारायण राणेंकडे विकासाचा कोणताही मुद्दा राहिलेला नाही. केंद्रिय मंत्री असूनही खासदार निवडून आल्यानंतर सुध्दा राणेंनी गेल्या सात- आठ महिन्यात कोणकोणत्या गावाला, कोणकोणत्या तालुक्यात भेटी दिल्यात याची यादी टाकावी. राणेंची रेंज आता संपलेली आहे. राणेंनी खर्या अर्थाने आपला रिर्चाज वाढविण्यासाठी प्रयत्न करू नये, या भागातील सर्व शिवसैनिक हे शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहेत. हे सर्व शिवसैनिक राणेंना धडा शिकवतील, असा विश्वास श्री. उपरकर यांनी व्यक्त केला आहे.
निष्ठावंत हा शब्द नारायण राणेंना अजिबात कळणार नाही, कारण नारायण राणेंनी अनेक पक्ष बदललेले आहेत. आता अनेक कार्यकर्ते राणेंना सोडू लागले असल्यामुळे राणेंना आता निष्ठावंतांची व्याख्या समजत नाही. राणेंनी निष्ठेची व्याख्या जनतेला सांगावी. आपण निष्ठेमध्ये जनतेला काय- काय केले हे सांगावे. राणे सातत्याने सांगत आहेत की वैभव नाईक मुख्यमंत्र्यांकडे जाणार होते. पण राणेंनी खरं सागाव कि ते स्वतः मुख्यमंत्र्यांना वारंवार भेटत होते ते कशासाठी भेटले हे जाहिर करावं असे आवाहन श्री. उपरकर यांनी यावेळी केले.
