मालवणातील नरकासुर मंडळांना पोलीस निरीक्षकांकडून सूचना जारी…!

⚡मालवण ता.२९-: दिवाळी निमित्त मालवण शहरात दरवर्षी नरकासुर दहन जोरदार पद्धतीने होत असताना यावर्षी नरकासुर बनविणाऱ्या मंडळांसाठी मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी विविध सूचना जारी केल्या आहेत. नरकासुर धिंड काढण्यासाठी डीजे ला बंदी असणार असून निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने नरकासुर स्पर्धा घेण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागणार असल्याची माहिती श्री. कोल्हे यांनी दिली.

दि. १ नोव्हेंबर रोजी नरकचतुर्दशीला मालवणात नरकासुर दहन कार्यक्रम होणार असून नरकासुर धिंड व दहन आदल्या दिवशी रात्री ते नरकचतुर्दशी दिवशी सकाळी ६ या वेळेत करू नये, ही वेळ वगळून इतर वेळेत करावे. नरकासुर दहना दरम्यान ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. वाद्यामुळे वृद्ध व आजारी माणसांच्या तब्येतीवर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच नरकासुर धिंडसाठी पारंपारिक वाद्ये वाजविण्यास परवानगी राहील. कुठल्याही प्रकारचा डीजे ज्याचा बेसिक आवाज ८० ते १०० डेसिबलच्या वरती असतो, त्या डीजेला परवानगी दिली जाणार नाही. तसेच वाद, तंटे होणार नाहीत याची काळजी घ्यावी. विधानसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू असून आचारसंहितेचे पालन करावे. नरकासुर स्पर्धा घ्यायची असेल तर निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागेल, असे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page