सिंधुदुर्गनगरी ता.: भारत निवडणूक आयोगाने विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू केली आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यानुसार निरीक्षकांचे जिल्ह्यात आगमन झाले असून आज जिल्हाधिकारी कार्यालयात सामान्य निरीक्षक श्री प्रविणकुमार थिंड, निवडणूक खर्च निरीक्षक श्रीमती के.जी. दिव्या, पोलिस निवडणूक निरीक्षक श्री दीपक रंजन यांनी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या सोबत जिल्हा प्रशासनाने निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला.
यावेळी निवडणूक निरीक्षकांनी कायदा व सुव्यवस्था, स्थिर सर्वेक्षण पथकाने केलेली कारवाई, मतदानांची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीपद्वारे करण्यात येत असलेली जनजागृती, अधिकारी, कर्मचारी यांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देणे, गृह मतदान, मतदान केंद्रावर देण्यात येत असलेल्या सुविधा, व्होटर हेल्पलाईन ॲप, सी -व्हिजल ॲप, सुविधा अॅप या विषयावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीची संपूर्ण माहिती जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिली.
यावेळी अपर जिल्हाधिकारी रवी पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्रीमती राजश्री पाटील, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत , खर्च नियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी शिवप्रसाद खोत, अमित मेश्राम, एमआयडीसीचे विभागीय अधिकारी श्री रेवणकर आदी उपस्थित होते.
