मालवणच्या भंडारी हायस्कुलच्या पूर्वा बांदकर हिची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड…!

मालवण (प्रतिनिधी)

मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कूलची इयत्ता दहावीची विद्यार्थिनीं कु. पूर्वा दत्तात्रय बांदकर हिची राज्यस्तरावरील शालेय १७ वर्षे वयोगट कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सदर स्पर्धेचे सामने तालुका क्रीडा संकुल, कोपरी ठाणे (पूर्व ) येथे दि. २१ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निवड झालेली पूर्वा बांदकर ही एकमेव मुलगी असून ती जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

क्रीडा व युवा संचलनालय आणि जिल्हा क्रीडा परिषद, क्रीडाधिकारी रत्नागिरी यांच्या वतीने रत्नागिरी येथे विभागस्तरीय १७ व १९ वर्षे वयोगट शालेय कबड्डी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत मालवणच्या भंडारी ए. सो.. हायस्कुलच्या १७ वर्षे वयोगट मुलींच्या संघाने सांगली संघावर ४८-१७ अशी मात केली. तर उपांत्य सामन्यात कोल्हापूर संघाविरुद्ध भंडारी हायस्कुलच्या संघाने उत्तम सांघिक खेळाचे प्रदर्शन केले तसेच पूर्वा दत्तात्रय बांदकर हिने चमकदार कामगिरी केली. पूर्वा हिच्या उत्कृष्ट खेळाची दखल घेऊन तीची ठाणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेसाठी १७ वर्षे वयोगट मुलींच्या संघात निवड झाली आहे. पूर्वा बांदकर हिला प्रशिक्षक मनोहर साळुंखे, क्रीडा शिक्षक आर. बी. देसाई, यांचे मार्गदर्शन लाभले.

तसेच पूर्वा बांदकर हिने २०० मीटर धावणे स्पर्धेतही यश मिळवून तीची डेरवण येथे होणाऱ्या विभागीय धावणे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तर ४× १०० रिले स्पर्धेत पूर्वा बांदकर, तनिष्का केळूसकर, कृतिका चव्हाण, निधी सारंग या भंडारी हायस्कुलच्या संघाने विभाग स्तरावर द्वितीय क्रमांक मिळविला.

पूर्वा बांदकर हिच्या या यशाबद्दल भंडारी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विजय पाटकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत यांनी अभिनंदन केले आहे. तर प्रशालेत संस्थेचे कार्याध्यक्ष श्री सुधीर हेरेकर यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. तसेच तनिष्का केळूसकर, कृतिका चव्हाण, निधी सारंग यांनाही गौरविण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक हणमंत तिवले, पर्यवेक्षक आर. डी. बनसोडे, क्रीडा शिक्षक आर. बी. देसाई, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई, पालक श्री. दत्तात्रय बांदकर यांच्यासह इतर शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

You cannot copy content of this page