तहसिलदारांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता नाही..

रेवंडी खाडीपात्रातील अतिक्रमण प्रकरण;ग्रामस्थांमध्ये नाराजी

मालवण (प्रतिनिधी) रेवंडी येथे नदी खाडीपात्रातील कांदळवनाची तोड करून अनधिकृतरित्या उभारण्यात आलेल्या अतिक्रमणाविरोधात संतप्त झालेल्या रेवंडी येथील ग्रामस्थांनी खाडीपात्रात उतरून आंदोलन केल्यानंतर या अतिक्रमणावर महसूल प्रशासन वनविभाग व पतनविभाग यांच्या वतीने आठ दिवसात संयुक्तरित्या कारवाई करू असे आश्वासन तहसीलदार अजय पाटणे यांनी दिले असताना आठ दिवस उलटून गेले तरी अद्यापपर्यंत याबाबत कोणतीही कारवाई झाली नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे रेवंडी खाडीपात्रात जांभा दगड व माती टाकून मार्ग तयार केला जात आहे. यामुळे पाण्याचा प्रवाह बदलून त्याचा फटका रेवंडी गावाला असण्याची भीती आहे. याबाबत ग्रामपंचायतीने विरोध दर्शवित प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली. शासकीय पंचनामे झाले. कांदळवन व बंधारा तोड झाल्याचे स्पष्टही झाले. मात्र कारवाई होत नसल्याने रेवंडी ग्रामस्थानी थेट खाडीपात्रात उतरून आंदोलन छेडले होते. कांदळवन तोड हा गंभीर गुन्हा असताना वनविभाग कारवाई का करत नाही? पतन विभागाच्या अखत्यारीत असलेल्या बंधाऱ्याची तोड झाल्याचे पंचनाम्यात स्पष्ट होते याबाबत पतन विभाग गप्प का आहे असे अनेक सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केले होते. त्यावेळी सदरच्या अतिक्रमणावर महसूल प्रशासन वनविभाग व पतनविभाग यांच्या वतीने संयुक्तरित्या कारवाई करू, असे आश्वासन तहसीलदार अजय पाटणे यांनी दिले होते. तहसीलदारांच्या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्या ग्रामस्थांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र आठ दिवसात कोणतीही कार्यवाही न झाल्यास तिन्ही कार्यालयाच्या समोर एकाच दिवशी उपोषण सुरू करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. दरम्यान, या प्रकरणी आठ दिवस उलटून गेले तरी प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page