⚡मालवण ता.१०-: कांदळगाव येथील ओझर विद्यामंदिर प्रशालेमध्ये रांगोळी मार्गदर्शन वर्ग संपन्न झाला. ओझर विद्यामंदिरच्या पालक-शिक्षक संघाने पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या या मार्गदर्शन वर्गात कांदळगाव येथील रांगोळी कलावंत संजय कुंभार व रुपेश मेस्त्री यांनी विद्यार्थ्यांना रांगोळी रेखाटन व रंगभरण याविषयी मार्गदर्शन केले.
रांगोळी काढताना विविध आकार कसे काढावेत? कोणकोणत्या वस्तूंचा वापर करावा? रंग कसे भरावेत? याबाबत संजय कुंभार व रुपेश मेस्त्री यांनी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांकडूनही प्रात्यक्षिकही करून घेतले. त्यानंतर दोन्ही मार्गदर्शकांची मुलाखत घेऊन मुलांनी रांगोळी विषयी अधिक माहिती जाणून घेतली. विविध सणांमध्ये व कार्यक्रमांमध्ये रांगोळी काढण्याचे प्रसंग अनेक वेळा येत असल्याने हा रांगोळी मार्गदर्शन वर्ग विद्यार्थ्यांना लाभदायक ठरला. रांगोळी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन केल्याबद्दल प्रशालेच्या प्रभारी मुख्याध्यापकांनी पालक-शिक्षक संघाचे व प्रशालेतील विद्यार्थ्यांना रांगोळी काढण्याचे उत्कृष्ट मार्गदर्शन केल्याबद्दल मार्गदर्शक संजय कुंभार व रुपेश मेस्त्री यांचे आभार मानले.
