सिंधुदुर्गनगरी ता ७
माध्यमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांकडे माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शिक्षक भारती संघटनेने करत आज आपल्या मागण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाबाहेर तोंडावर काळी पट्टी बांधून मुक आंदोलन छेडले.
रजा कालावधी मान्यता प्रस्ताव चार वर्षापासुन प्रलंबित आहेत. मागील मार्च मधील खुलासा घेऊन मान्यता देणार सांगूनही अदयाप एकही प्रस्ताव मान्य नाही. शिक्षकांची मेडीकल बिले प्रलंबित आहेत, थकित बिले कोल्हापूर कि शिक्षण विभाग यांची माहिती निश्चीत कोणालाही नाही. कायम मुख्याध्यापक मान्यता देण्यास दिरंगाई होत आहे. एकाच शाळेतील काही प्रस्ताव पुर्ण केले जातात, काही प्रलंबित ठेवले जातात. प्रत्येक प्रस्तावाची चेकलिस्ट जाहिर करावी, सहविचार सभा एकही झालेली नाही मागणी करुन सुध्दा लावण्यात आली नाही. शिक्षकाने कामकाज सोडून किती वेळा फे-या मारव्यात हे जाहिर करावे. अशैक्षणिक कामे शिक्षकांना देऊ नये. व्हॉटऑप वर आदेश काढून ताताडीने पुर्तता करण्याचे आदेश काढू नये. नागरीकांची सनद मागणी करुनही लावलेली नाही, प्रत्येक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना दुययम सेवापुस्तक देण्यात यावे. व याची पडताळणी करण्याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न करत माध्यमिक शिक्षकांच्या विविध समस्यांबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक भारती संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष संजय वेतूरेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद शिक्षण विभागासमोर आंदोलन केले. यावेळी उपाध्यक्ष सुनील जाधव, विद्यानंद पिळणकर, गिरीश गोसावी आदी उपस्थित होते.
