माजी उपनगराध्यक्ष सुहास हडकर यांच्याकडून कौतुक..
मालवण : (प्रतिनिधी)
मालवण धुरीवाडा येथील एका सौभाग्यवतीला तिच्या पहिल्या पतीनेच पेट्रोल अंगावर ओतून जिवंत जाळून टाकण्याची घटना घडल्यानंतर या घटने विरोधात मालवण मधील सर्वपक्षीय महिला वर्गाने एकत्र येत मोर्चा काढत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची केलेली मागणी तसेच आरोपी मोकाट सुटल्यास आम्ही शिक्षा देऊ असे ठणकावल्याने हा मोर्चा समस्त महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बळ देणारा असून मालवणातील महिलांची एकसंघ कृती कौतुकास्पद आहे, असे मालवणचे माजी उपनगराध्यक्ष सुहास हडकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
महिलेवर पेट्रोल ओतून जाळल्याप्रकरणी मालवण तालुक्यातील सर्वपक्षीय, सर्वधर्म महिलांनी आवाज उठवून त्या नराधमास आम्ही सोडणार नाही, असे महाराष्ट्र वासियांना दाखवून दिले. मालवणात मुली, महिला यांवर अत्याचार किंवा दुखापत पोहचवण्याचा कुठलाही प्रकार यापुढे घडल्यास आम्हीच आरोपीना शिक्षा देऊ अशी ही भुमिका महिलांनी घेतली. मी माझ्या ४३ वर्षाच्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये अशा प्रकारे सर्वप्रक्षीय सर्व धर्म महिलांचे उस्फूर्त धडाकेबाज आंदोलन पाहिलेले नाही, असे सुहास हडकर यांनी म्हटले आहे.
यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या, त्याबद्दल काही ठिकाणी मोर्चाही निघाले, आम्ही देखील अशा मोर्चात सहभागी घेतला. मात्र त्या घटना एक दोन दिवस बातम्या पर्यंतच मर्यादित राहिल्या, मात्र सर्वधर्मिय, सर्वपक्षीय महिलांनी एकत्र काढलेल्या मोर्चामुळे व मांडलेल्या आक्रमक भूमिकेमुळे महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे. महिला मोर्चा हा गरीब अत्याचारग्रस्त महिलांना आधार आहे. त्यामुळेच असे कृत्य करू पाहणाऱ्या नराधमांनी आताच सावध व्हावे, कोणतेही गैरकृत्य कराल तर आता तुमचाही कपाळ मोक्ष होईल, असेही सुहास हडकर यांनी म्हटले आहे.
