पंचतारांकित ताज हॉटेलचे पुढच्या आठवड्यात भूमिपूजन: मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार भूमिपूजन..
ओरोस ता २७
जिल्ह्यातील पहिल्या पंचतारांकित हॉटेलचे उद्घाटन पुढील आठवड्यात होत आहे. वेळागर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ताज हॉटेलचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. यावेळी सावंतवाडी मतदार संघात तिलारी येथून पाणी पुरवठा करण्यासाठी राबविलेल्या २०० कोटी खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ सुद्धा केला जाणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्गनगरी येथील सावंतवाडी विधानसभा जनता दरबार उद्घाटन प्रसंगी बोलताना दिली.
यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राजन तेली आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना मंत्री केसरकर यांनी, सिंधूरत्न विकास योजनेतून सुरू केलेल्या हॅप्पी एग्ज या योजनेमधून पुरविण्यात आलेले कुक्कुट पक्षी आता अंडी देवू लागले आहेत. सध्या एक लाख अंडी उत्पादित होत आहेत. हा आकडा पाच लाख करण्याचा प्रयत्न आहे, असे सांगितले.
