Headlines

नवबौद्ध विकासाच्या १२२ कामाना मंजूरी

३ कोटी ५ लाखांची कामे समाज कल्याण समिती सभेत निर्णय

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास करणे योजनेअंतर्गत ३ कोटी ५ लाख निधी खर्चाच्या विविध १२२ कामांना आजचा समाज कल्याण समिती सभेत मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषद समाज कल्याण समितीची सभा सभापती अंकुश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील बॅरिस्टर नाथ पै समिती सभागृहात संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा समाज कल्याण अधिकारी मदन भिसे, समिती सदस्य राजलक्ष्मी डिचवलकर, मालवण सभापती अजिंक्य पाताडे, वैभववाडी सभापती अक्षता डाफळे, आदींसह खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास करणे योजनेअंतर्गत विविध विकास कामे घेतली जातात. त्यासाठी ६ कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे .या निधीतून जिल्ह्यातील विविध १२२ कामांच्या प्रस्तावांना आजच्या सभेत मंजुरी देण्यात आली. या मंजूर करण्यात आलेल्या कामांवर ३ कोटी ५ लाख रुपये निधी खर्च होणार आहे. तर उर्वरित २ कोटी ९५ लाख शिल्लक निधी मार्च २०२२ पर्यंत खर्च करायचा आहे .त्यामुळे शिल्लक निधीतून आणखी काही प्रस्ताव मंजूर करण्यात येणार आहेत. तरी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी आवश्यक कामाचे प्रस्ताव सादर करावेत. असे आवाहन सभापती अंकुश जाधव यांनी सभेत केले. २० टक्के सेस निधीतून मागास वस्त्यांमधील रस्ते, समाजमंदिर, गटारे, पायवाटा, दुरुस्तीची कामे घेण्यात येणार आहेत, त्यासाठी प्रस्ताव सादर करावे. नव्याने प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांना विशेष सभा घेऊन मंजुरी देण्याचा निर्णय आजच्या सभेत घेण्यात आला. समाज कल्याण विभागाला प्राप्त झालेला निधी ऑक्टोबर २०२१ पर्यंत शंभर टक्के खर्च करण्याच्या दृष्टीने कामाला गती द्या. तसेच शिष्यवृत्तीचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मिळण्याच्या दृष्टीने कार्यवाही करा .असे आदेश सभापती अंकुश जाधव यांनी आजच्या समाजकल्याण समिती सभेत अधिकाऱ्यांना दिले.

You cannot copy content of this page