शिवपुतळा आठ महिन्यातच कोसळतो; मोदींची गॅरंटी गेली कुठे…?

माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांचा सवाल:मोदींनी माफी मागूनही अशा प्रकारचे गंभीर कृत्य कधीही माफ होणार नाही..

⚡मालवण ता.३१-:
नौदल दिनानिमित्त मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उभारणी चुकीच्या पद्धतीने करण्यात आली. हा पुतळा आठ महिन्यातच कोसळला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी गेली कुठे ? मोदींची गॅरंटी आता संपलेली आहे. मोदींनी माफी मागूनही अशा प्रकारचे गंभीर कृत्य कधीही माफ होणार नाही, या दुर्घटनेने शिवप्रेमीना झालेले दुःख कधीही भरून येणार नाही, असे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा राज्याचे माजी राज्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रवीण भोसले यांनी सांगत शिवरायांचा झालेला हा अवमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही, या दुर्घटनेस सरकार जबाबदार असून यातील दोषींवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही भोसले यांनी केली.

मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत राजकोट येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत ठाकरे शिवसेना सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, ठाकरे शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रमोद कांडरकर तसेच काँग्रेसचे प्रांतिक सदस्या साईनाथ चव्हाण, जिल्हासरचिटणीस अरविंद मोंडकर, काँग्रेस तालुकाप्रमुख मेघनाद धुरी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे, सेवादल काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, अगोस्तीन डिसोजा, बाबू डायस, अँथोनी फर्नांडिस, ममता तळगावकर, जेम्स फर्नांडिस, संदेश कोयंडे, लक्ष्मीकांत परुळेकर, सरदार ताजर, संदेश फाटक, रितेश प्रभूआजगावकर, मनोज वाघमारे, सुनील गावडे, सचिन मुळीक, सखाराम राऊळ, हेमंत मोंडकर, नरेश हुले यांसह महाविकास आघाडीचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पाहणीनंतर प्रवीण भोसले म्हणाले, छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळणे ही साऱ्यांसाठी दुर्दैवी घटना आहे. मात्र इथे येऊन काही लोकं राजकारण करतात, असे करू नये. कोणत्याही राजकीय हेतूने आम्ही या किल्ल्यावर आलो नाहीत, महाविकास आघाडी म्हणू फक्त न्याय मागायला आलो आहोत. छत्रपतींचा पुतळा कोसळणे म्हणजे एक प्रकारे आपल्या अस्मिता ढासळणे आहे. ज्या शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली त्यांचे स्मारक देखील आपण व्यवस्थित उभारू शकत नाही, हे दुर्दैव आहे, असेही ते म्हणाले. पुतळा कोसळून शिवरायांचा अवमान झालेला असताना पुतळा शिक्षणमंत्री दीपक केसरकर पुतळा कोसळला हे चांगले झाले म्हणतात, महायुतीचे इतर नेतेही बेजबाबदार वक्तव्ये करतात, या अशा लोकांमुळेच अशा दुर्घटना घडतात अशी टिकाही भोसले यांनी केली.

या दुर्घटनेमुळे सरकार जनतेच्या मनातून पूर्णपणे उतरले आहे. आता जनताच आता सरकारला शिक्षा देऊन सत्तेपासून दूर ठेवणार असून महाविकास आघाडीची सत्ता राज्यात येणार आहे. सत्ता आल्यावर महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली राजकोट येथे देशाला अभिमान वाटेल असा नव्याने शिवरायांचा पुतळा बसविण्यात येईल, असेही प्रवीण भोसले म्हणाले.

You cannot copy content of this page