⚡मालवण ता.२६-: शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख अरविंद नारायण मांजरेकर (६५) यांचे सोमवारी सकाळी निधन झाले.
मालवण शहरातील रेवतळे येथील रहिवासी असणाऱ्या अरविंद मांजरेकर यांची मालवण तालुक्यात शिवसेनेच्या निर्मितीपासून निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळख होती. शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात आक्रमकपणे पुढाकार घेउन शासनयंत्रणेवर तुटुन पडण्यासाठी मांजरेकर यांची ओळख होती, त्यांनी सर्वसामान्यांच्या अनेक प्रश्नांवर आंदोलने करुन न्याय मिळवून दिला होता. गाजलेल्या मालवणातील बोट अपहरण प्रकरणात जे शिवसैनिक सामील झाले होते त्यात त्यांचा समावेश होता
माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून भाई गोवेकर यांच्या खांद्याला खांदा लावून मांजरेकर यांनी मालवण तालुक्यात तळागाळात शिवसेनेचे जाळे विणले होते. त्यांच्या पश्चात दोन मुली, मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. धीरज मांजरेकर यांचे ते वडील होत.
मांजरेकर यांच्यावर रेवतळे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, भाजप, शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
