रंगसरी कार्यक्रम सादर करणाऱ्या कलाकारांच्या अंगावर पडू लागले स्लॅबचे पाणी…

मामा वरेरकर नाट्यगृहातील प्रकार:दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने उपस्थितांची नाराजी..

⚡मालवण ता.२५-: अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा मालवण आणि नगरवाचन मंदिर मालवण यांच्या वतीने बरसती रंगसरी हा कार्यक्रम आज सायंकाळी मालवण नगरपालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात सुरु असताना कलाकारांनी सादर केलेल्या कलाविष्काराने उपस्थित प्रेक्षक हे रंगसरीच्या बरसणाऱ्या कलांनी चिंब न्हाऊन निघाले असतानाच दुसरीकडे प्रत्यक्षात आपली कला सादर करणाऱ्या कलाकारांना रंगमंचावरील छप्पराच्या स्लॅब मधून जलधारा कोसळू लागल्याने कलाकारांचं चिंब झाले अशातच कलाकारांनीही स्टेजवर गोणपाटे टाकून आपली कला सादर करण्याचे धाडस दाखविले. मात्र या दुरावस्थेमुळे नेहमीच चर्चेत राहिलेल्या मामा वरेरकर नाट्यगृहातील ही दुरावस्था आता प्रकर्षाने समोर आल्याने नाट्यगृहाच्या दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नसल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले मामा वरेरकर नाट्यगृह बचाव मोहीम हाती घेण्याचे आता कलाकारांबरोबरच नाट्यप्रेमी मालवणवासीयांनी घेण्याची गरज निर्माण झाली आहे

यासंबंधीचे अधिक वृत असे की,
मालवण नगरपालिकेने सन २००३ मध्ये २ कोटी ५० लाख रुपये खर्चून प्रशस्त असे मामा वरेरकर नाट्यगृह उभारले. मालवणात नाट्यगृह व्हावे यासाठी १९८१ पासून प्रयत्न करण्यात येत होते. या नाट्यगृहासाठी जागेचे आरक्षणही ठेवण्यात आले होते. मात्र मालवण नगरपालिका ही क वर्गातील नगरपालिका असल्याने हे नाट्यगृह उभारणे शक्य होत नव्हते. अशाही परिस्थितीत तत्कालीन उपनगराध्यक्ष सुबोधराव आचरेकर व माजी नगराध्यक्ष भाई पै यांनी नाट्यगृह बांधण्याचा धाडसी निर्णय घेतला. या नाट्यगृहासाठी तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांनीही शासनाकडून ५० लाखाचा निधी दिला होता. २००३ मध्ये हे नाट्यगृह पूर्ण होऊन उदघाटन झाल्यावर हे जिल्ह्यातील अतिशय भव्य आणि सुसज्ज असे नाट्यगृह मानले गेले. या नाट्यगृहाच्या रंगमंचाला कै सुबोधराव आचरेकर रंगमंच असे नावही देण्यात आले आहे त्यानंतर अनेक गाजलेल्या नाटकांचे प्रयोग या नाट्यगृहात होऊन अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकारांनी या नाट्यगृहाचे कौतुकही केले. हे नाट्यगृह मालवणच्या नाट्य व सांस्कृतिक चळवळीचे महत्वाचे अंग बनले. आजही हे नाट्यगृह जिल्ह्यात अव्वल आहे. मात्र या नाट्यगृहाच्या देखभाल दुरुस्तीकडे नगरपालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधीचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने या नाट्यगृहाची सध्या दुरावस्था झाली आहे. मोडलेल्या खुर्च्या, बिघडत राहणारी एसी ची व्यवस्था, लाईट व फॅन मधील बिघाड, स्टेज वरील अडचणी, स्लॅब मधून होणारी गळती अशा विविध समस्यानी या नाट्यगृहाला ग्रासले आहे. मात्र दुरुस्तीबाबत प्रयत्न होत नसल्याचे चित्र आहे.

आज मामा वरेरकर नाट्यगृहात अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा मालवण आणि नगर वाचन मंदिर यांच्या वतीने बरसती रंगसरी हा विविध कलाविष्कारांचा समावेश असलेला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम सुरु असतानाच पावसाचे पाणी नाट्यगृहाच्या स्लॅबमधून पावसाचे पाणी पडू लागले नाट्यगृहाच्या स्टेजवरच पाणी पडू लागल्याने कलाकारांना आपली कला सादर करताना काहीसा अडचणींचा सामना करावा लागला. गळतीमुळे भर कार्यक्रमात स्टेजवर गोणपाटे घालून कार्यक्रम सुरु ठेवण्याची वेळ आयोजकांवर आली. यावेळी कलाकारांनी गोणपाट घातलेल्या स्टेजवरच नृत्य व इतर कला सादर करण्याचे धाडस दाखविले. तसेच इतर ठिकाणीही गळती होऊन काही ठिकाणी पाणीही साचले.

भर कार्यक्रमात गळती होऊन घडलेल्या प्रकाराबाबत कलाकारांसह उपस्थित प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गेले काही वर्षे नाट्यगृहाची दुरावस्था झाली असताना त्याकडे लक्ष देण्यास प्रशासनाला वेळ नाही, अशी टीका उपस्थितानी केली. मामा वरेरकर नाट्यगृह हे मालवणची अस्मिता असून त्याची दुरुस्ती झालीच पाहिजे या मागणीसाठी आंदोलनही केले जाईल असे मत व्यक्त केले जात आहे.

You cannot copy content of this page