आता चिपी आणि मोपावरून होणार पुण्यासाठी उड्डाण…

बेंगळुरू, हैद्राबादनंतर फ्लाय-९१ ची पुण्यासाठी भरारी :३१ ऑगस्ट पासून आठवड्यातून दोन दिवस सेवा..

⚡कुडाळ ता.२३-: बेंगळुरू आणि हैद्राबाद पाठोपाठ फ्लाय-९१ हि कंपनी आता चिपी आणि मोपा-गोवा येथून पुण्यासाठी उड्डाण करण्यासाठी सज्ज झाली आहे. येत्या ३१ ऑगस्ट पासून हि सेवा सुरु होणार आहे अशी माहिती फ्लाय-९१ कंपनीच्या वतीने देण्यात आली. प्रामुख्याने सिंधुदुर्गवासीयांसाठी हि महत्वाची सेवा मनाली जात असून फ्लाय-९१ कंपनीने प्रवाशांच्या मागणीचा विचार करून लवकर चिपी विमानतळावरून हि सेवा सुरु केल्याने पुण्याला हवाईमार्गे जाण्याचा मार्ग खुला झाला आहे.
गोवा स्थित फ्लाय-९१ कंपनीने अल्पावधीतच प्रवाशांच्या सोयीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून देशातील प्रमुख शहरांना जोडणाऱ्या विमान सेवा सुरु केल्या. सुरुवातीला बेंगळुरू आणि त्यांनतर हैद्राबाद सेवा फ्लाय-९१ ने सुरु केल्या. तकाही किरकोळ अपवाद वगळता या सेवा अगदी पावसाळ्यात सुद्धा नियमित सुरु आहेत. या सेवा सुरु होतानाच फ्लाय-९१ कंपनीने पुण्याला विमानसेवा सुरु करण्याबाबत विचारविनिमय आणि चाचपणी सुरु केली होती. सिंधुदुर्गातील बरेचजण पुणेकर झालेले आहेत. शिक्षण, नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने पुण्याला त्यांचे वास्तव्य आहे. सिंधुदुर्गशी त्यांची नाळ जोडलेली आहे. त्यामुळे रस्ता मार्गे किंवा आठवड्यातून काही दिवस चालणाऱ्या रेल्वेमार्ग हे प्रवाशी सिंधुदुर्गात येत असतात. पण या प्रवासात ८ ते १० तास जातात. शिवाय सीझनमध्ये लक्झरी बसेसचे तिकिटाचे दार सुद्धा जास्त असतात. त्यामुळे पुणे मार्गावर चिपीवरून विमान सेवा सुरु करण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत होती.
फ्लाय-९१ कंपनीने सुद्धा पुणे विमानसेवा सुरु व्हावी या दृष्टीने प्रयत्न सुरु केले होते. पण पुणे यथील लोहगाव विमानतळ हे एअर फोर्सच्या अखत्यारतीत येत असल्याने तिथून उड्डाणे कमी होतात. मर्यादित स्लॉट उपल्बध असतात. पण अलीकडॆच या विमातळावरील नवीन प्रवासी टर्मिनलचे लोकार्पण विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाल्याने आता प्रवासी वाहतुकीसाठी वाढीव स्लॉट उपलब्ध झाले आहेत. फ्लाय-९१ ने अलीकडेच पुण्याहून जळगाव विमानसेवा देखील सुरु केली आहे.
फ्लाय-९१ विमान कंपनीच्या वतीने आठवड्यातून दोन दिवस पुणे ते सिंधुदुर्ग आणि पुणे ते गोवा-मोपा या मार्गावर विमानसेवा चालविण्यात येणार आहे. पुणे येथून दार शनीवारी आणि रविवारी सकाळी ८.०५ वाजता उड्डाण करणारे विमान ९.१० वाजता चिपीला पोहोचेल तर परतीच्या प्रवासासाठी चीपी येथून ९.३० वाजता निघून पुणे येथे १०.३५ वाजता पोहोचेल. पुण्याहून गोव्याला जाण्यासाठी सुद्धा शनिवार रविवारीच विमानसेवा सुरु राहणार आहे. पुण्याहून गोवा-मोपाला जाण्यासाठी सकाळी १०.५५ वाजता विमान उड्डाण करेल आणि गोव्याला दुपारी १२.१० वाजता पोहोचेल. गोव्याहून पुण्याला जाण्यासाठी सकाळी ६.३६ वा विमान उड्डाण करेल आणि पुण्याला ७.४० वाजता पोहोचेल. एकेरी प्रवासासाठी तिकीट दर १९९१/- रुपये एवढा माफक ठेवण्यात आला आहे.
. एप्रिल पासून फ्लाय-९१ ची चिपीहून हैदराबाद हे सेवा आठवड्यातून तीन दिवस आणि बेंगलोर आठवड्यातून चार दिवस विमानसेवा सुरू आहे. माफक तिकीट दर आणि नियमित सेवा यामुळे फ्लाय नाईन वनच्या विमानसेवांना जिल्हावासियांचा समाधानकारक प्रतिसाद मिळत आहे. केवळ पाच महिन्यात जिल्ह्यातून तिसऱ्या मार्गावर विमानसेवा सुरू करून फ्लाय नाईन वनने कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर ही सेवा सुरू होत असल्याने पुण्याहून जिल्ह्यात येऊ इच्छिणाऱ्या गणेश भक्तांसाठी माफक दरात विमानसेवेचा पर्याय उपलब्ध झाला आहे. फ्लाय नाईन वन ने आता जिल्ह्यातून सर्वाधिक मागणी असलेल्या मुंबई मार्गावर विमानसेवा सुरू करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. फ्लाय नाईन वन ने या मार्गावर सेवा सुरू केल्यास प्रवाशांचे चांगले सहकार्य सुद्धा मिळू शकेल.

चिपी विमानतळावर सेवा सुविधा हव्यात

चिपी विमानतळावरून सध्या मुंबई, बेंगळुरू, हैद्राबाद या ठिकाणी विमानसेवा सुरु आहे. शेकडो प्रवासी प्रवास करत आहेत. लवकरच पुणे विमानसेवा सुरु होईल. पण अजूनही चिपी विमानतळावर सेवा सुविधांची वानवाच आहे. अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि शेजारी मोपा विमानतळ असुनही चिपी विमानतळाला जिल्ह्यातून नियमित मिळत आहे. नजीकच्या काळात अपुऱ्या सोयी सुविधा पूर्ण केल्यास आणि तिकिटांचे दर माफक ठेवल्यास चिपी विमानतळाला निश्चितच अधिक प्रवाशी पसंती देतील. त्यामुळे राजकीय नेते, लोकप्रतिनिधी यांनी आपापली राजकीय वस्त्रे बाजूला ठेवून येथील जनतेसाठी सिंधुदुर्ग चिपी विमानतळ सक्षम करणे गरजेचे आहे.

You cannot copy content of this page