निराधार वृद्धेला दात्यांनी दिला आधार

⚡सावंतवाडी ता.२०-: कोलगाव – मारुती मंदिर नजीक येथील निराधार वृद्धेच्या दुरूस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या घराच्या छपराची करूण कहाणी एका दैनिक वृत्तपत्राने मांडताच काही दात्यांनी केलेल्या मदतीतून या घराच्या छप्पराची दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे पावसाळ्यात घराच्या दुरुस्ती अभावी अनर्थ घडण्याच्या शक्यतेने या निराधार वृद्धेने सुटकेचा नि:श्वास टाकला. या निराधार वृद्धेच्या दिवंगत मुलाच्या वर्ग मित्रांसह दात्यानी केलेल्या मदतीमुळेच निवाऱ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. याबद्दल या निराधार वृद्धेने मुलाच्या वर्ग मित्रांसह इतर दाते व दैनिक तरुण भारतचे आभार मानले आहेत.

लक्ष्मी विठ्ठल दळवी (७२) या निराधार वृद्धेच्या पतीचे २५ वर्षां पूर्वी निधन झाले. पतीच्या पश्चात प्रतिकूल परिस्थितीत चंद्रशेखर आणि देवीदास या दोन्ही मुलांचा सांभाळ करताना शिक्षण दिल्यानंतर मोठा मुलगा चंद्रशेखर याच्या आकस्मित निधन झाले. त्यानंतर आठ वर्षांपूर्वी दुसरा लहान मुलगा देवीदास याचेही आकस्मित निधन झाले आणि ही वृद्धा निराधार झाली. त्यानंतर अनेक संकटांना सामोरे जात आणि परिस्थितीशी दोन हात करीत मी वृद्धा जीवन जगत होती. दरम्यान चार-पाच वर्षापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेले घराचे छप्पर पावसाळ्यात कोणत्याही क्षणी या वृद्धेच्या डोक्यावरचे छप्पर कोसळण्याची स्थिती होती. डोक्यावरचे छप्परच धड नसल्यामुळे पावसाळ्यात काय होणार? या काळजीने या वृध्देची सध्या झोपच उडाली होती. त्यामुळे हा आसरा दुरुस्त करण्यासाठी कोणी मदत करेल का? या प्रतीक्षेत ही वृद्धा होती.


या निराधार वृद्धेची घर दुरूस्तीची व्यथा दैनिक तरुण भारत संवादने वाचकांसमोर मांडताच काहींनी या वृद्धेच्या बँक खातेवर मदत जमा केली. तसेच काहींनी यासाठी मदत देण्याची ग्वाही दिली. सावंतवाडी येथील पंचम खेमराज महाविद्यालयाच्या १९९१ बॅचच्या कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत या घराच्या दुरुस्तीसाठी सुमारे २५ हजार रुपयाची मदत केली. या निराधार वृद्धेचा दुसरा मुलगा देविदास हा याच बॅचमध्ये होता. त्याच्या पश्चात त्याच्या आईवर आलेले हे संकट पाहून देविदासचे वर्गमित्र एकत्र आले. या आर्थिक मदतीसह या वर्ग मित्रांनी वृद्धेच्या पायाला झालेल्या जखमेवरही उपचार केले. तसेच यापुढे काही मदत लागल्यास ती देण्याचे आश्वासन देविदासच्या आईला त्याच्या वर्ग मित्रांनी दिले.


एकनाथ गवळी, सूर्यकांत मेस्त्री, शिवराम राऊळ या कारीवडे गावातील सुतार कारागिरांनी तसेच ओवळीये गावातील अजय सावंत, सुधीर नाईक आणि आया जाधव, अंजनी जाधव, प्रतिभा जाधव या पारपोली गावातील महिलांनी अल्प मोबदल्यात प्रसंगी भर पावसातही या घर दुरुस्तीच्या कामात महत्त्वाची भूमिका बजावली.या घराच्या छप्पर दुरुस्तीच्या कामात सावंतवाडीच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या माया चिटणीस आणि कारिवडेचे सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांनीही महत्त्वाचे योगदान दिले.

You cannot copy content of this page