⚡मालवण ता.१८-: मालवण येथील ना. अ. दे. टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालय येथे नारळी पौर्णिमेनिमित्त ‘नारळ लढविण्याची भव्य स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. यात मुलांच्या गटात मंथन सुतार तर मुलींच्या गटात रिया गावडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धेचे उदघाटन प्रशालेचे मुख्याध्यापक लक्ष्मण वळंजू व कनिष्ठ महाविद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक हेमंत साटम यांच्यात नारळ लढवून झाले. स्पर्धेला शुभेच्छा देताना मुख्याध्यापक वळंजू म्हणाले की, आपल्या कोकण भूमीत निसर्गावर आधारित सण साजरे केले जातात. त्यात नारळा संबंधी १२ प्रकारचे खेळ खेळले जातात. हे खेळ खेळण्यामागचा उद्ददेश समाजातील परस्परातील आक्रमक वृत्तीचे शमन करून स्नेहभाव निर्माण करणे हा आहे. तो स्नेहभाव विद्यार्थ्यांमध्ये रुजवला जावा यासाठी आपल्या कनिष्ठ महाविद्यालयात ही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून यावर्षी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मुलांमध्ये एकूण ६४ स्पर्धक तर मुलींमध्ये ३२ स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धा खूप चुरशीची झाली. मुलांच्या गटात सुरज मोंडकरने तर मुलींमध्ये श्रुती आचरेकर हिने द्वितीय क्रमांक पटकाविला. विजेत्यांना रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी सुमित मसुरकर व हेमंत साटम यांनी सांभाळली. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आर. एस. पवार, किशोर धुरी, ए. ए. चावरे, पी. ए. मयेकर, आर. बी. जाधव, पी. डब्ल्यू. तोंडवळकर, सुविधा तिनईकर, भक्ती जंगले, उमा सामंत यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अस्मिता रावराणे यांनी केले. मानसी धामापूरकर यांनी आभार मानले
