कोलकाता प्रकरणातील दोषींना फाशी द्या…

कुडाळमध्ये कोलकाता घटनेचा रॅली काढून निषेध:डॉक्टर्स, बॅ नाथ पै शिक्षण संस्था यांच्या तर्फे निषेध रॅली..

⚡सिंधुदुर्ग ता.१८-: कोलकाता येथिल  महिला डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा  द्या या मागणीसाठी आज कुडाळ शहरात बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था आणि विविध डॉक्टर्स संघटनांच्या माध्यमातून कुडाळ पोलीस ठाण्यावर निषेध रॅली काढण्यात आली. अमानवीय अशा या कृत्याबद्दल दोषींना फाशीची शिक्षा दिली नाही आणि डॉक्टरांवरचे हल्ले असेच सुरु राहिले तर मात्र आम्हाला स्टेथोस्कोप खाली ठेवावे लागतील असा इशारा डॉक्टर्स आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिला आहे.
     
कोलकाताच्या आर जी कर मेडिकल कॉलेजच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेला अत्याचार आणि तिची अमानुष हत्या याचे पडसाद हळूहळू देशभर उमटत आहेत आणि या अन्याय विरोधात एक  चीड समाजात निर्माण झाली आहे. निषेध मोर्चे आणि रॅली काढून या घटनेचा निषेध केला जातोय. कुडाळची बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था आणि डॉक्टरांच्या विविध संघटना यांनी एकत्र येत या अमानवी घटनेविरोधात कुडाळ शहरात निषेध रॅली काढली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा इथून या रॅलीला सुरुवात झाली. गुन्हेगारांना फाशी द्या, नो सेफ्टी नो ड्युटी अशा अनेक घोषणांनी विद्यार्थी आणि डॉक्टर्सनी आसमंत दणाणून सोडला. या रॅलीत डॉक्टरांच्या इंडियन मेडिकल असोसिएटशी, कुडाळ मेडिकल असोसिएशन, डीएफए या संघटनांसोबतच बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे फिझिओथेरपी, नर्सिंगचे विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. हि रॅली कुडाळच्या मुख्य रस्त्यावरून थेट कुडाळ पोलीस ठाण्यात आली. त्या ठिकाणी सुद्धा घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी डॉ. संजय आकेरकर, डॉ. प्रशांत कोलते, डॉ. गुरुराज कुलकर्णी, डॉ. संजीव निगुडकर,  डॉ सुरज शुक्ला, उमेश गाळवणकर, प्रा. कल्पना भांडारी, विद्यार्थिनी मृण्मयी खानविलकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून कोलकाताच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. दोषींना लवकरात फाशीची शिक्षा देऊन पीडितेला न्याय द्यावा अशा आशयाचे निवेदन यावेळी पोलिसांना देण्यात आले.
     नुकताच आपण ७७ वा स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा केला. एकीककडे स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनाचा जलोष साजरा होत असताना दुसरीकडे एका महिला डॉक्टरवर अत्याचार होऊन तिची हत्या होते हा विचित्र विरोधाभास भारतीयांना भूषणावह नाही. कोलकाता मध्ये जे घडलं ते अमानवीय होते. माणुसकीला काळिमा फासणारे होते. त्यामुळे महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्याला जोपर्यंत फाशी होत नाही तो पर्यंत हा लढा सनदशीर मार्गाने चालू राहणार आहे, असाच सूर या निषेध रॅलीतून उमटत होता.
यावेळी बॅ नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, डॉ. संजय आकरेकर, डॉ. गुरुराज कुलकर्णी, डॉ. जी. टी. राणे, डॉ. पाटणकर, डॉ. नवांगुळ, डॉ. सुधीर राणे, डॉ. रवींद्र जोशी,  डॉ. संजीव निगुडकर, डॉ. चुबे, डॉ. जयसिंह रावराणे, डॉ. प्रशांत कोलते, व्ही. आर. नाईक, प्राचार्य कल्पना भांडारी, नर्सिंग कॉलेजे आणि फिझिओथेरेपी कॉलेजचे विद्यार्थी, प्राध्यापक, बॅरिस्टर नाथ शिक्षण संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page