मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी ता २६ लेप्टो स्पायरोसिस अर्थात लेप्टो हा आजार वेळेत योग्य उपचार झाल्यास पूर्णतः बरा होतो. त्यामुळे नागरिकांनी या आजाराला घाबरून न जाता शासकीय आरोग्य यंत्रणेकडे उपचार घ्यावेत. सर्व्हेसाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना खरी माहिती द्यावी. ताप आल्यास लपवू नये असे आवाहन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी आज गुरुवारी पत्रकार परिषदेत केले आहे.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दालनात आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री पराडकर बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलिपे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ महेश खलिपे म्हणाले की, सिंधुदुर्गात गेल्या दहा वर्षांपासून लेप्टो साथीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. तसेच जिल्ह्यात तापाचे रुग्ण सुद्धा वाढले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेने ‘ताप’ प्रतिबंध मोहिम हाती घेतली आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत रुग्णाचा सर्व्हे सुरुच आहे. कोरोनामुळे तापाचे रुग्ण टेस्ट करून घेण्यास घाबरत आहेत. त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामाची जाणीव जागृती करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. ताप असलेल्या प्रत्येक रुग्णाचा शोध घेवून त्यांची कोविड, लेप्टो व मलेरिया या तिन्हीची टेस्ट करण्यात येणार आहे. जिल्ह्यात आज पर्यंत १६५ लेप्टो चे रुग्ण मिळाले आहेत. त्यातील ५ मृत्यु आहेत यात कुडाळ मध्ये ३ तर कणकवली व वैभववाडी तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. २१७ गावे जोखिमग्रस्त म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. २१ हजार ८५६ नागरिक बाधित क्षेत्रात येत असून त्यांना लेप्टो प्रतिबंधात्मक डॉक्सी सायक्लोन गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलीपे यांनी यावेळी दिली.