माऊली युवा प्रतिष्ठान पदाधिकाऱ्यांचा आरोप: मायनिंगला विरोध नाही, परंतु स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी आमचा लढा..
⚡सावंतवाडी ता.२९-: रेडी गावात सुरू असलेल्या मायनिंगमुळे गाव उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे असे असताना मायनिंग कंपनी करून गावाला चांगल्या दर्जाच्या सुविधा शैक्षणिक आरोग्य व पाण्याच्या सुविधा उपलब्ध करून देत असल्याची माहिती प्रसारित केली जात आहे. मात्र ही निवळ दिशाभूल असून प्रत्यक्षात मात्र रेडीवासीयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे,त्यामुळे लोकप्रतिनिधींनी गावात येऊन याबाबत वास्तव जाणून घ्यावे,असे आवाहन माऊली प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.
तेसच ते पुढे म्हणाले की रेडी गावातील मायनिंग हे जिल्ह्यातील आदर्श मायनिंग असल्याची माहिती नेहमी मंत्री दीपक केसरकर देत राहतात, परंतु गेली 70 वर्ष गावात मायनिंग सुरू आहे.दोन पिढ्या या मायनिंगच्या विळख्यात सापडल्या, मात्र भविष्यात येणाऱ्या पिढीला तरी यातून सुखाचा मार्ग मिळावा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.तसेच मायनिंग कंपनीकडून रेडी गावाला बिसलरी दर्जाचे पाणी दिले जाते चांगल्या शैक्षणिक सुविधा तसेच आरोग्य सुविधा पुरविल्या जातात अशी माहिती देण्यात येते तसेच रोजगार मिळत असल्याची माहिती दिली जाते, मात्र प्रत्यक्षात कंपनीकडून पुरवठा करण्यात येणारे पाणी हे पिण्यास अत्यंत अयोग्य दर्जाचे असते त्याचप्रमाणे कोणत्याही शैक्षणिक सुविधा पुरविल्या जात नाहीत कंपनीकडून सुरू करण्यात आलेले रुग्णालय दोन वर्षातच बंद झाले.
तर सुरुवातीला 150 स्थानिक कामगार या कंपनीत काम करत होते परंतु आता ती संख्या पन्नास वर आली आहे. त्यामुळे रोजगारासाठी स्थानिक युवकांना गोव्याचा मार्ग स्वीकारावाला लागला आहे. आमचा मायनिंगला विरोध नाही, मात्र मायनिंगच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार व आवश्यक सुविधा पुरविल्या जाव्यात यासाठीच आमचा लढा आहे असेही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
