देशान आपल्याला काय दिलं यापेक्षा आपण देशाला काय देऊ शकतो ही भावना महत्त्वाची- माजी सैनिक नामदेव सावंत..
सावंतवाडी ता.२९-:
सावंतवाडी तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि माजी सैनिक यांच्या संयुक्त विद्यमाने कारगिल विजय दिवस सावंतवाडी येथे मँगो हॉटेल परिसरात साजरा करण्यात आला. यावेळी 1999 साली झालेल्या भारत – पाकिस्तान मधील कारगिल युद्धातील शहीद जवानांना आंदरांजली वाहण्यात आली. तसेच त्यांच्या अतुलनीय शौर्याचा इतिहास जागवण्यात आला.
यावेळी मराठा बटालियन मध्ये कार्यरत असणारे माजी सैनिक नामदेव सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, या कालखंडात आपण प्रत्यक्ष या युद्धात सहभागी होऊ शकलो नाही. परंतु, या युद्धाच्या वेळी आपण उरी सेक्टर मध्ये कार्यरत होतो. यावेळी सर्व सैनिकांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यांना आप आपल्या बटालियन मध्ये सामील होण्याचे आदेश देण्यात आले होते. उरी सेक्टर मधील मराठा बटालियन ला या युद्धात सहभागी होण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु, काही कारणास्तव ते आदेश रद्द करण्यात आले. -16 तापमान असणाऱ्या भागात हे युद्ध झाले होते. अनेक अडचणीचा सामना करत केवळ आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठीजवानांनी हे युद्ध केलं. असे ते म्हणाले, आपण प्रत्येक जण सैन्यात भरती होऊ शकत नाही. परंतु, ज्या ठिकाणी कार्यरत आहोत त्या ठिकाणावरून ही देशसेवा करू शकतो. देशाने मला काय दिलं यापेक्षा मी देशाला काय देऊ शकतो ही भावना आपल्या देशाला पुढे घेऊन जाणारी आहे असे ते म्हणाले.
यावेळी सावंतवाडीतील नागरिकांनी उदंड असा प्रतिसाद देत शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. या कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् म्हणून करण्यात आली.
