कोकणच्या राजकीय पटलावरील “कोकणरत्न” म्हणजे दीपक केसरकर…

राजकीय वारसा नसतानाही नगराध्यक्ष ते कॅबिनेट मित्र पदापर्यंत मजल:मंत्री केसरकर यांच्यावर वाढदिवसा निमित्त सुरू आहे शुभेच्छांचा वर्षाव

⚡सावंतवाडी ता.१८-: कोणताही राजकीय वारसा नसताना स्वतःच्या हिमतीवर नगराध्यक्ष ते राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत मजल घेणारा नेता म्हणजे दीपक वसंतराव केसरकर. स्वतःच्या स्वकर्तृत्वावर सिद्ध केलेलं महायुती मधील ‘कोकणरत्न’. श्रद्धा अन् सबुरीच्या मार्गावर चालणाऱ्या या नेत्यानं आपल्या कार्यकर्तृत्वानं महाराष्ट्रासह जगभरात वेगळी ओळख निर्माण केली‌. ऐतिहासिक सावंतवाडी शहराचा नगराध्यक्ष ते राज्याचा कॅबेनिट मंत्री, हा त्यांचा प्रवास प्रेरणादायी असा आहे.

वडील वसंतशेठ केसरकर यांच्या समाज कार्याचा वारसा पुढे घेऊन जाण्याच काम दीपकभाईंनी केलं. यातूनच राजेसाहेब श्रीमंत शिवरामराजे भोसले यांच्या प्रेरणेतून १९९२ मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. स्वीकृत नगरसेवक म्हणून राजकीय कारकीर्दीस सुरुवात केली. १७ डिसेंबर १९९६ मध्ये ते पहिल्यांदा सावंतवाडीच्या सर्वोच्च अशा नगराध्यक्षपदी विराजमान झाले. तब्बल ११ वर्ष त्यांनी सावंतवाडी शहराचं नगराध्यक्षपद भुषवलं. सर्वाधिक काळ नगराध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान त्यांनाच जातो. २००९ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. युती सरकारमध्ये ते गृह व वित्त राज्यमंत्री राहिले. सलग तीन टर्म सावंतवाडी मतदारसंघातून ते निवडून आले. कुणालाही जमली नाही ती हॅट्रिक दीपकभाईंनी केली. एकनाथ शिंदेंच्या बंडामध्ये प्रवक्ता म्हणून संघर्षमय परिस्थिती त्यांनी शिताफीनं हाताळली. यानिमित्ताने केसरकरांची एक वेगळी बाजू संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिली. नव्यानं स्थापन झालेल्या सरकारमध्ये त्यांची थेट कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली. शालेय शिक्षण खात्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली.

शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री म्हणून त्यांनी शिक्षणव्यवस्थेत अमृलाग्र बदल घडवून आणले. विद्यार्थ्यांप्रती संवेदनशील असा मंत्री त्यांच्या रूपानं महाराष्ट्राला लाभला. पदभार स्वीकारल्यानंतर मुलांवरचा ताण, त्यांच्या पाठीवरचं ओझं कमी करण्याचा मोठा निर्णय त्यांनी घेतला. बालकांचा मोफत व सक्तीच्या कायद्यात दुरुस्ती, नवभारत साक्षरता कार्यक्रम, प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना, सरकसकट मोफत गणवेश योजना, विद्यार्थ्यांना बूट पाय मोजे, पोषण आहारात अधिक जिन्नस, शाळेत परसबागा, आजी-आजोबा दिवस, स्वच्छ मॉनिटर, शिष्यवृत्तीत वाढ, दत्तक शाळा योजना, मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा, शिक्षण सेवक मानधनात भरीव वाढ, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मानधनात भरघोस वाढ, शिक्षक भरती प्रक्रियेत सुलभता, माजी सैनिक भरती, केंद्रप्रमुख भरती अशा असंख्य निर्णयातून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली.

जपानमध्ये मराठी भाषिकांना एकत्र आणून मराठी भाषेची अभिवृद्धी करण्याच्या दृष्टीने परदेशातील मंडळांना सहकार्य करण्यासाठी तेथील संस्था आणि महाराष्ट्र शासन यांच्यात महत्वपूर्ण सामंजस्य करार झाला. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना भविष्यात चांगली संधी प्राप्त होणार आहे. आजवर असंख्य क्रांतिकारी निर्णय शिक्षण खात्याने घेतले आहेत. त्याचा फायदा लाखो वि‌द्यार्थी, शिक्षक, पालक, शिक्षकेतर कर्मचारी यांना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नविन शैक्षणिक धोरण आणल्यानं व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्यान धोरणात्मक निर्णय घेता आल्याच मंत्री केसरकर आवर्जून सांगतात. मिळालेल्या संधीचे सोने करण्याच्या दृष्टीने दीपक केसरकर यांनी अमुलाग्र बदल केलेत. त्याचे परिणाम नव्या पिढीच्या उत्कर्षात दिसून येणार आहेत.

यासह राज्याची आर्थिक राजधानी मुंबई शहराचे ते पालकमंत्री म्हणून पालकत्व निभावत आहेत. पर्यटन जिल्ह्यात जन्म घेतल्यानं ‘रत्नसिंधू’ योजनेचा अधिकाधीक फायदा कोकणच्या पर्यटनाला कसा होईल याकडे त्यांचं लक्ष असतं. एवढंच नव्हे, तर राज्याच्या अर्थ खात्यात महत्वपूर्ण योगदान त्यांनी दिलं आहे. फडणवीस सरकारमध्ये अर्थराज्यमंत्री म्हणून पाच वेळा राज्याचा अर्थसंकल्प त्यांनी सादर केला. विद्यमान सरकारच्या अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस तद्नंतर अजित पवार यांच्या कार्यकाळातही राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान हा केसरकरांनाच दिला गेला.
इथल्या कौशल्य प्राप्त तरूणांना जर्मनीत नोकरी मिळवून देण्यासाठी मंत्री केसरकर आग्रही आहेत. ‘जर्मनीशी झालेल्या सामंज्यस्य करारांतर्गत’ राज्यातील ४ लाख तरुणांना जर्मनीत नोकरीची संधी देण्यासाठी केसरकर आग्रही आहेत. यासाठीच जर्मन भाषा प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ देखील राज्यात करण्यात आला.

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची एकुणच राजकीय आणि सामाजिक वाटचाल सामान्य माणसांशी जोडलेली आहे. धार्मिक, आध्यात्मिक वारसा जपणारे दीपकभाई साईबाबांचे निस्सीम भक्त आहेत. जात, धर्म, पंत याच्या पलीकडे विचार करणारे ते राजकारणी आहेत. कोकणी जनतेलाच त्यांनी आपलं कुटुंब मानलं आहे‌‌. बोलण्यापेक्षा कृती करणारा मी कार्यकर्ता आहे‌. जनतेच्या हितापेक्षा अधिक काही महत्त्वाचं नाही असं सांगणारा हा नेता आहे. अशा या नेत्यास ग्लोबल महाराष्ट्र परिवाराकडून लाख लाख शुभेच्छा..

You cannot copy content of this page