चिंदर गावात कोतवाल नसल्याने ग्रामसभेत ग्रामस्थांची तीव्र नाराजी…

⚡मालवण ता.११-: मालवण तालुक्यातील चिंदर भटवाडी सजा कोतवाल पदाची नियुक्ती होऊनही गेले सहा महिने सदर कोतवाल हजर झालेला नसल्याने याबाबत चिंदरच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रजेवर असलेल्या कोतवालाची नियुक्त रद्द करून गावातील स्थानिकांमधून कोतवाल नियुक्त करावा, असा सर्वानुमते ठराव या ग्रामसभेत घेण्यात आला.

चिंदर ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात घेण्यात आलेल्या तहकूब ग्रामसभेत आयत्या वेळी येणाऱ्या विषयात ग्रामस्थांनी कोतवाल विषयी नाराजी व्यक्त केली. चिंदर भटवाडी तलाठी सजा इथे नियुक्त करण्यात आलेला कोतवाल सहा महिने होऊन गेलें तरी अजून हजर झालेला नाही. वारंवार वरिष्ठाकडे पाठपुरावा करूनही सदर कोतवाल अजून पर्यंत हजर होण्यासाठी कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असे ग्रामस्थांनी सांगितले. कोतवाल नसल्याने चिंदर गावातील सर्वसामान्य नागरीकांची परवड होत आहे, त्यामुळे नियुक्त रद्द करून नवीन भरती करून गावातील स्थानिकांमधून कोतवाल नियुक्त करावा, असा ठराव यावेळी घेण्यात आला. तसेच ग्रामपंचायतीने संबंधित खात्याकडे ठराव पाठून त्याचा पाठपुरावा करावा असेही ग्रामसभेत ठरले.

यावेळी ग्रामसभाध्यक्ष सरपंच नम्रता महंकाळ, उपसरपंच दिपक सुर्वे, ग्रामविकास अधिकारी मंगेश साळसकर, ग्रामपंचायत सदस्य केदार(पप्पू)परुळेकर, महेंद्र मांजरेकर, शशिकांत नाटेकर, माजी सरपंच तथा भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, तंटामुक्त अध्यक्ष संतोष गावकर, मनोज हडकर, विश्वास खरात, भानुदास मेस्री, चंद्रसेन पारकर, दिगंबर जाधव, प्रमोद सुर्वे ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page