देवगड (प्रतिनिधी)११ जुलै २०२४
देवगड आगारातून सुटणारी देवगड तेलीवाडी गढीताम्हाणे ही एसटी अनियमित येत असल्यामुळे बरेच वेळा शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना चालत जावे लागते. पावसाळा असल्यामुळे पावसात भिजल्याने मुलांचे हाल होतात. त्यामुळे ही एसटी नियमित सोडण्यात यावी यासाठी रहाटेश्वर गढीताम्हाणे ग्रामस्थांनी आज देवगड आगार व्यवस्थापक यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले. आगार व्यवस्थापक लाड यांनी आज (गुरुवार ११ जुलै) पासून ही बस नियमित वेळेत सोडण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यानुसार आज सायंकाळी साडेचार वाजता ही बस देवगड आगारातून सोडण्यात आली.
गढीताम्हाणे रहाटेश्वर या भागातील मुले तळेबाजार व देवगड हायस्कूल मध्ये शिक्षणासाठी येत आहेत. मुलांसाठी गेली कित्येक वर्ष देवगड आगारातून देवगड ते गढीताम्हाणे तेलीवाडी पर्यंत एसटी सोडली जात आहे.परंतु सोडण्यात येणारी शालेय एसटी फेरी ही कायम अनियमित वेळेत असते. त्यामुळे शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना एसटी नसल्यामुळे पावसात भिजतच चालत जावे लागत असल्याने रात्री घरी जाण्यास विलंब होतो.तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी पर्यायी अन्य गाडीसाठी धावपळ करत एक किलोमीटर पेक्षा जास्त अंतर चालत यावे लागते . एसटी वाहतुकीमुळे होणारी शालेय विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेता ही एसटी फेरी नियमित वेळेत सोडण्यात यावी .अशा आशयाचे निवेदन रहाटेश्वर व गढीताम्हाणे
ग्रामस्थांनी देवगड आगार व्यवस्थापक निलेश लाड यांना दिले आहे .यावेळी उपसरपंच आनंद मोरे, अमित कदम, सौ स्वरा पांचाळ, सुरेंद्र कदम महादेव तांबे, रितेश कदम, कृणाल लाड, पार्थ लाड, अनिमेष धुरी, शुभम मेस्त्री, करण घाडी, आनंद वाडकर, श्रेयस वानिवडेकर, प्रदीप मोरे, प्रताप कदम आर्यन राणे, आनंद बांदकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते
दरम्यान देवगड एसटी आगार व्यवस्थापक निलेश लाड यांनी येथील ग्रामस्थांना आजपासूनच ही फेरी नियमित सोडण्याची आश्वासन दिले होते. त्यानुसार आज सायंकाळी साडेचार वाजता देवगड आगारातून देवगड गढी ताम्हाणे तेलीवाडी गोवळ ही बस सोडण्यात आली आहे.वेळेत बस आल्याने विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे
