काळ आला होता पण…;
साटेली भेडशीतील घटना…
दोडामार्ग (वा.)
साटेली भेडशी येथील खालच्या बाजारातील पुलावरील पाण्यातून
वाहून गेलेल्या चारचाकी वाहनातील तिघांना वाचविण्यात अखेर यश आले.काळ आला होता पण वेळ आली नव्हती असेच या घटनेला म्हणावे लागेल.स्थानिक ग्रामस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नामुळे ते तिघेही वाचले.तिघेही जण कणकवली येथील असून ते साटेली भेडशी येथे मित्राकडे आले होते. सुहास परब, प्रसाद क्षीरसागर व श्रीपती करण अशी त्यांची नावे आहेत. घरी परतत असताना पुराच्या पाण्यातून मार्ग काढण्याचा चालकाचा प्रयत्न फसला आणि गाडी पाण्याबरोबर वाहून गेली व १०० मीटरवर जाऊन झाडीत अडकली.
ते तिघेही सायंकाळी घरी परतत असताना पुलावर पुराचे पाणी आले होते. बरीच वाहने पाणी कमी होण्याच्या प्रतीक्षेत होते. मात्र या गाडीच्या चालकाने पुरातून गाडी काढण्याचा प्रयत्न केला.पण पुरातून गाडी पुढे जाणार नाही हे लक्षात येताच त्याने गाडी मागे घेण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा वेग जास्त असल्याने ती पुरात वाहून जाऊ लागली.स्थानिकांनी कार वाहून जाताच आरडाओरड केली. पोलिसांना पाचारण करण्यात आले. स्थानिकांनी पुढे नदीत जाऊन पाहिले असता कार झुडपात अडकलेली दिसली. स्थानिकांनी लगेच मदतकार्यात सुरुवात केली. प्रथम दोघांना दोरीच्या साह्याने बाहेर काढले. त्यानंतर टपावर चढून बसलेल्या चालकाला बाहेर काढले.त्यावेळी पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी, अन्य पोलिस कर्मचारी, पोलिस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.
