मूळ मालकांना केले परत:प्रभारी अधिकारी मनीष कोल्हटकर यांची माहिती..
⚡ओरोस ता.०६-: सेंट्रल एक्विपमेंट आयडेंटी रजिस्टर ॲपच्या माध्यमातून गहाळ झालेले पाच मोबाईलचा शोध लावून मूळ मालकांना सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याच्यावतीने परत करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मनीष कोल्हटकर यांनी दिली आहे.
भारत सरकारव्दारे मोबाईल चोरी / हरवणे याबाबतच्या तक्रारीबाबत मोबाईल शोधून तो मोबाईल धारकांना परत मिळवून देण्याकरीता सेंट्रल एक्विपमेंट आयडेंटी रजिस्टर हे ऑनलाईन पोर्टल विकसित केलेले आहे. या पोर्टलव्दारे ज्या व्यक्तींचे मोबाईल गहाळ होतात किंवा चोरीस जातात त्याची माहिती https://www.ceir.gov.in या वेबसाईटव्दारे सेंट्रल एक्विपमेंट आयडेंटी रजिस्टर या पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदवू शकतात. तक्रार नोंदविल्यानंतर पोलीस विभागाकडून त्याबाबत तांत्रिक पध्दतीने हा मोबाईल शोधून संबंधित मोबाईल धारकांना योग्य त्या तजविजीने परत केला जातो. याबाबत पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सावंतवाडी यांचे मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मनीष कोल्हटकर व पोलीस कॉन्स्टेबल योगेश मुंढे यांनी ५ मोबाईल फोन हस्तगत करून मूळ तक्रारदार यांना परत केलेले आहेत. तरी सर्व मोबाईल गहाळ अगर हरवला किंवा चोरीस गेला तर तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनला आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन कोल्हटकर यांनी केले आहे.
