वेताळ बांबर्डे ग्रामस्थांचा महावितरणला इशारा:येत्या ३० जुलैपर्यंत वेताळ बांबर्डे ग्रामस्थांच्या वीजपुरवठ्याबाबत सुरू असलेल्या समस्यांचे निराकरण करा..
⚡कुडाळ ता.०२-: येत्या ३० जुलैपर्यंत वेताळ बांबर्डे ग्रामस्थांच्या वीजपुरवठ्याबाबत सुरू असलेल्या समस्यांचे निराकरण करा, ट्रांसफार्मर कॅपॅसिटी वाढवा, एका वायरमनची नियुक्ती करा अन्यथा महावितरणकडून येणाऱ्या वीज बिलांची पणदूर कार्यालय अधिकाऱ्याच्या टेबलावर होळी करू असा इशारा वेताळ बांबर्डे ग्रामस्थ तथा सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांनी पणदूर येथील महावितरणच्या कार्यालयाला धडक देत मंगळवारी सकाळी दिला. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन उपकार्यकारी अभियंता यांना देण्यात आले.
वेताळबांबर्डे ग्रामस्थांना मागील १५ दिवसापासून कमी होल्टेज, लाईट ये-जा यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्याचा उद्रेक झाल्याने मंगळवारी वेताळ बांबर्डे ग्रामस्थांनी पणदूर महावितरण कार्यालयाला धडक देत उपकार्यकारी अभियंता भोपळे यांना धारेवर धरले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ एकवटले होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे, वेताळ बांबर्डे सरपंच वेदिका दळवी उपसरपंच प्रदीप गावडे, ग्रामपंचायत सदस्य साजुराम नाईक, शैलेश घाटकर, अवधूत सामंत आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामस्थांनी उपकार्यकारी अभियंता दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, वेताळ बांबर्डे गावातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून वीजवाहिन्यांवर मोठ्या प्रमाणात झाडांची फांद्या आल्या आहेत . यासाठी लवकरात लवकर या फांद्या हटविण्यात याव्यात जेणेकरून वीज पुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल., तसेच शेतीसाठी सुद्धा अनियमित पावसामुळे पंपाद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे . यामुळे शेतकऱ्यांनाही नाग त्रास होत आहे. हा त्रास दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.
तर यावेळी अधिकाऱ्यांना ३० जुलै पर्यंत चा कालावधी देण्यात आला असून ३० जुलै पर्यंतच्या कालावधीत पुरवठा सुरळीत न झाल्यास आमच्या मागण्या मान्य न झाल्यास वीज बिलाची होळी करण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांनी दिला आहे.
