दुरुस्तीकडे दुर्लक्ष दिला जात नसल्याने नाराजी:लवकरात लवकर सुरू करण्याची होत आहे मागणी..
⚡सावंतवाडी ता.०२सहदेव राऊळ-: मळगाव येथील वाडीवाडीनुसार बसविण्यात आलेले पथदीप दरवर्षीप्रमाणे यंदाही ऐन पावसाळ्यातच बंदावस्थेत असल्याने येथील लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. दरवर्षी पावसाळा सुरू होताच पथदीप बंद पडत असल्याने तसेच तक्रार करूनही त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने येथील लोकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. हे पथदीप लवकरात लवकर सुरू करण्यात यावेत, अशी मागणीही मळगाव ग्रामस्थांमधून होत आहे.
मळगाव येथील वाडी वाडीत बसविलेले पथदीप जवळजवळ गेला महिनाभर बंदच आहेत. मळगाव येथील काही वाड्यातील लोकांचा जाण्या-येण्याचा मार्ग हा एकदम अडगळीचा आहे. तसेच सध्या पाऊस सुरू असल्याने रात्रीच्या वेळी येथून ये-जा करताना या लोकांचे अधिकच हाल होत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळा सुरू होताच या सर्व वाडींमधील पथदीप बंद पडले आहेत. ग्रामस्थांनी तक्रार नोंदवूनही पथदीप सुरू करण्यात येत नाहीत. मात्र दरवर्षी गणेश चतुर्थीच्या तोंडावर आठवडाभर अगोदर पथदीप सुरू करण्यात येतात. त्याप्रमाणे पथदीप सुरु करण्यासाठी यंदाही गणेश चतुर्थी सणाची वाट बघितली जात आहे का, असा सवालही मळगाव ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे. ग्रामस्थांची होणारीही गैरसोय लक्षात घेता संबंधित विभागाने बंद पडलेले हे सर्व पथदीप लवकरात लवकर सुरु करावे, अशी मागणी होत आहे.
