ना गटार… ना त्यांची साफसफाई… नागरिकांचे मात्र हाल:संजय भोगटे यांची गटार सासफाईची मागणी..
कुडाळ ता.१७-: पोस्ट ऑफिस ते डॉ. सवदत्ती यांच्या दवाखान्यासमोरून जाणारा गटार पावसाळ्यापूर्वी साफ करणे गरजेचे असताना सुद्धा तो गटार साफ केला नसल्यामुळे तेथे पाणी साचत राहते. परिणामी त्याठिकाणी चिखल तयार होतो. नागरपंचायतने त्वरित तो गटार साफ करावा आणि नागिरकांची होणारी गैरसोय .टाळावी अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे यांनी केली आहे. कुडाळच्या नगर पंचायतच्या कारभारावर त्यांनी शेलक्या शब्दात टीका केली आहे.
संजय भोगटे म्हणतात, मोठ्या व्यापाच्या कामामुळे नगरपंचायतीला सदर गटार उन्हाळ्यामध्ये साफ करणे शक्य झाले नसेल पण, पाऊस लागल्यानंतर त्या ठिकाणी पाणी साचत राहिल्यामुळे तेथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना, रिक्षा व्यावसायिकांना नाहक त्रास होत आहे. हे लक्षात घेवून तरी गटार साफ करणे गरजेचे होते. पण असे असताना सुद्धा गटार साफ केला जात नाही. फक्त बघ्याची भूमिका नगरपंचायत घेत आहे हे दुर्दैवी. त्या बाजुला राहणाऱ्या घरमालकांच्या विहिरी मध्ये गटारातील पाणी उतरते. दरवर्षी त्या घरमालकानी विहीर उपसत राहायची का ? आणि कोकणात धो धो पाऊस पडून सुद्धा नगरपंचायतीच्या नियोजन शून्य कारभारामुळे विकतचे पाणी प्यायचे का ? हे काय चाललंय !! असा सवाल श्री. भोगटे यांनी उपस्थित केला आहे.
पोस्ट ऑफिस समोरुन मालवणला जाणाऱ्या रस्त्याची क्रॉसिंग मोरी साफ न केल्याने जास्तीचे पाणी रस्ता ओलांडून पलीकडच्या बाजूला मोठया प्रमाणात येत राहते. त्या घाणीच्या पाण्यातूनच तेथील घरमालकाना आपल्या घरात जावे लागत आहे…
त्या रस्त्याने नगरपंचायतचे अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी सर्वजण दिवसातून अनेकवेळा येत जात असतात. याची पाहणी नगर पंचायत का करु शकत नाहीं? पाऊस पडत असताना त्या ठिकाणच्या रिक्षा व्यावसायिकांच्या रिक्षांची चाके अर्धी पाण्यात बुडालेली असतात. पाणी साचल्यामुळे प्रवाशी तेथे रिक्षात बसू शकत नाहींत. रिक्षा चालक उडी मारून रिक्षात बसतात आणि रिक्षा पूढे नेवून प्रवाशांना रिक्षात बसवावे लागते. अशी कसरत होत असतानाही नगरपंचातीचे दुर्लक्ष का? त्या ठिकाणि पावसाचे पाणी साचून राहिल्यामुळे चिखल झालेला आहे. याकडे सुद्धा संजय भोगटे यांनी लक्ष वेधले आहे.
स्वच्छ, सुंदर नगर पंचायत बोर्डावर लिहिलेले गेले..प्रत्यक्षात मात्र नेहमी गजबजलेल्या रस्त्यावर मात्र चिखल. मस्त चाललय.!. जनतेने फक्तं चिखलातून मार्ग काढायचा, तेथील रिक्षा व्यावसायिकांनी उडी मारून रिक्षात बसायचे आणि आम्ही सर्व नागरिक ह्यांची फक्त मजा बघायची!!!!??.. धन्य ती स्वच्छ, सुंदर कुडाळ नगर पंचायत.! असे संजय भोगटे यांनी खंडाने म्हटले आहे.
गरज नाही त्या काही ठिकाणी गटार बांधला गेला. परंतू आवश्यक असलेल्या गांधी चौक येथे गटारच बांधला गेला नाहीं. कोर्ट, गोडाऊन आवार, भोसलेवाडी, होटेल पुष्पा या ठिकाणाहून येणारे पावसाचे पाणी गटार नसल्यामुळे बाजारपेठेत येते. परिणामी पाणी व्यापाऱ्यांच्या दुकानांत शिरत असल्याचे संजय भोगटे यांनी म्हटले आहे. त्यामुळे मुख्याधिकारी नगर पंचायत कुडाळ यांनी या समस्येकडे तात्काळ लक्ष देवून गटार त्वरित साफ करून घ्यावा आणि तेथील घरमालक, रिक्षा व्यावसायिक, ये जा करणारे नागरिक यांना दिलासा द्यावा अशी मागणी संजय भोगटे यांनी केली आहे.