उपकार कर्त्यांशी केलेली बेईमानी फार काळ टिकत नाही…

विनायक राऊत:महेश कांदळगावकर यांच्या टिकेला दिले प्रत्युत्तर..

⚡मालवण ता.१५-: लोकसभा निवडणुकीत मालवण शहरात ठाकरे शिवसेनेचे मताधिक्य घटण्यास आम. वैभव नाईक व माजी खासदार विनायक राऊत जबाबदार असल्याची टीका करणारे ठाकरे शिवसेनेचेच माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्यावर आज माजी खासदार विनायक राऊत यांनी नाव न घेता टीका करून समाचार घेतला. उपकार कर्त्यांशी केलेली बेईमानी फार काळ टिकत नाही. त्यामुळे तुम्हाला कोणाच्या पायाशी लोटांगण घालायचे आहे ते घाला असे विनायक राऊत यांनी सांगत महेश कांदळगावकर यांना फटकारले.

मालवण शहरात शिवसेनेचे मताधिक्य घटण्यास खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक जबाबदार असल्याचे ठाकरे शिवसेनेचे मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी म्हटले होते. त्याचबरोबर नगरपालिकेच्या प्रशासकावरही कोणाचा अंकुश नसल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचा आज मालवण दौऱ्यावर आलेल्या माजी खासदार विनायक राऊत यांनी खरपूस समाचार घेतला.

विनायक राऊत म्हणाले, आमदार वैभव नाईक यांनी मेहेरबानी केली नसती ही व्यक्ती नगराध्यक्ष बनली नसती. पाच वर्षांच्या नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत शिवसेना पक्षाला त्यांनी किती प्रोटेक्ट केले ते सांगावे. स्वतःला हरिश्चंद्राचा अवतार समजायचा आणि दुसरीकडे फावड्याने ओरबडायचे ही त्यांची वृत्ती आहे. त्यामुळे त्यांनी ज्याच्या पायाशी लोटांगण घालायचे आहे ते घालावे. असे सांगतानाच येत्या सर्व निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीचे उमेदवार विजयी होण्यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे राऊत यांनी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page