वैभववाडी भुईबावडा येथील घटना:एस टी बसमधील २० प्रवाशांना किरकोळ दुखापत..
⚡वैभववाडी ता.१२-: भुईबावडा रिंगेवाडी दरम्यान फार्म हाऊस नजिक एका तीव्र वळणावर एसटी बस आणि आयशर टेम्पोत समोरासमोर धडक झाली. ही घटना बुधवारी सकाळी ९. वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात एस टी बसमधील सुमारे २० प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून चार प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. यांना पुढील उपचारासाठी वैभववाडी ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले आहे. तर उर्वरित प्रवाशांना भुईबावडा येथील जिल्हा परिषद रुग्णालयात उपचार करुन पाठविण्यात आले.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, विजयदुर्ग- पुणे एसटी बस नंबर MH २० बी एल २९८१ भुईबावडा रिंगेवाडी दरम्यान फार्म हाऊस नजिक एका तीव्र वळणावर आली असता, गगनबावड्याहून भुईबावडा मार्गे येणाऱ्या आयशर टेम्पो नंबर MH ०९ FX ००३२ येत असता याठिकाणी रस्ता अरुंद असल्याने दोन्ही वाहनचालकांना साईड घेता आली नसल्याने दोन्ही वाहने एकमेकांना धडकली. या धडकेत एसटी बसचा चालकाकडील दर्शनी भाग दबला गेला. धडक मोठी असल्याने एसटीमधील २० प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून यातील ४ प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. एसटीत एकूण ६५ प्रवासी प्रवास करीत होते. या प्रवाशांना पुढील उपचारासाठी वैभववाडी येथील ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले आहे. तर उर्वरित प्रवाशांना भुईबावडा येथील जि. प. दवाखाना येथील डॉ. रविंद्र सावंत यांनी प्राथमिक उपचार करून सोडण्यात आले आहे.
एसटी बसमधील जखमींची नावे पुढीलप्रमाणे पूजा प्रकाश मोरे वय ३० रा. भुईबावडा, शब्बीया शानवाज शेख वय ५०(रा. कोल्हापूर) दिपीका दिपक राजापकर वय ३४ (रत्नागिरी) अपर्णा अजित पेंडूरकर वय ३५ (नाणार लांजा), सतिश शेट्ये वय ४५ रा. (जयसिंपूर), तेजराव विक्रम पाटील वय ६५(जळगाव), कविता सुरेशा कांबळे वय ५० रा जळगाव, सुरेश कांबळे वय ५५ रा. जळगाव, कविता सुनिल घोरपडे वय २६ रा. जळगाव अशी आहेत. घटनास्थळी वैभववाडी पोलिस निरीक्षक श्री अवसरमोल, पोलिस श्री. तावडे, जायभाय, दिलपे, पडवळ दाखल झाले आहेत. तर भालचंद्र साठे, सरपंच बाजीराव मोरे, भुईबावडा येथील आरटीआयचे तालुकाध्यक्ष कुणाल मोरे, शिवसेनेचे रविंद्र मोरे, अमिन फकिर, मंगेश मोरे, दिलीप मोरे, महेश सुर्यवंशी आदी घटनास्थळी उपस्थित होते.
