देशाला विनाशाकडे नेणे हीच मोदींची गॅरंटी…

डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची टीका ः देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार..

⚡कणकवली ता.२९-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील एनडीए सरकारने मागील 10 वर्षांत आर्थिक, राजकीय, सामाजिक घोडचुका केल्या आहेत. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीए बहुमताचा आकडा पार करू शकणार नाही. देशवासीयांनी राजकीय परिवर्तन घडविण्याचा ठरवले असून देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल, असा दावा मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु, नियोजन आयोगाचे माजी सदस्य, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी करतानाच देशाला विनाशाकडे नेणे हीच मोदींची गॅरंटी आहे, अशी टीका त्यांनी केली. कोकण व राज्यातील प्रश्‍नांवर लोकप्रतिनिधी आपआपसातील मतभेद विसरून केंद्र सरकारसमोर व संसदेत आवाज उठवत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
येथील काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. मुणगेकर बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, जिल्हा उपाध्यक्ष अनिल डेगवेकर, तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, अ‍ॅड. गणेश पारकर, आयशा सय्यद, विनायक मेस्त्री, प्रवीण वरुणकर, व्ही. के. सावंत, डॉ. सुनीता म्हापणकर, सुंदरवल्ली स्वामी, अहमद बोबडे, अनिल परुळेकर, अ‍ॅड. मनोज रावराणे, प्रकाश जैतापकर आदी उपस्थित होते.
मुणगेकर म्हणाले, कोकणातील प्रश्‍नांकडे राजकीय पक्ष व लोकप्रतिनिधींनी आजवर दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे कोकणाच्या विकासाला ब्रेक लागला आहे. कोकणातील आंबा व काजू ही महत्वाची पिके आहेत. या पिकांवर अनेकांच्या उदरनिर्वाह चालतो. मात्र, आस्मानी संकटाचा आंबा व काजू पिकांना फटका बसल्यामुळेे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान होते. त्यामुळे ऊस उत्पादकांना राज्य सरकार अनुदान देते. त्याचप्रमाणे अनुदान राज्य सरकारने कोकणातील आंबा व काजू उत्पादकांना दिले पाहिजे. आंबा व काजूची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. मात्र, याचा फायदा दलालांना होतो, हा फायदा आंबा व काजू उत्पादकांना मिळण्यासाठी शासनाने एक धोरण आखले पाहिजे. कोकणात टुरिझमला मोठ्या प्रमाणात वाव आहे. मात्र, शासनाच्या उदासीन धोरणामुळे कोकणातील पर्यटनवृद्धी ब्रेक लागला आहे. त्याचा आर्थिक फटका कोकणवासीयांना बसत आहे. कोकणाला 720 किमीची समुद्र किनारपट्टी लाभली आहे. मच्छीमार समुद्रातील मासे पकडून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. माशांची निर्यातही मोठ्या प्रमाणात होत आहे. कोकणासाठी मत्स्य विद्यापीठाची गरज असताना देखील सदर विद्यापीठ नागपुरला कशासाठी? असा सवाल त्यांनी केला. सिंधुदुर्गातील चिपी येथे विमानतळ सुरु झाले. मात्र, सध्या या विमानतळाची परिस्थिती गंभीर असून विमानांच्या अनियमित उड्डाणामुळे प्रवाशांचे हाल होत असल्याचे त्यांनी सांगितले.
देशाचे नियोजन करण्यासाठी काँग्रेस सरकारने नियोजन आयोगाची स्थापना केली होती. मात्र, 2014 मध्ये मोदी सरकारने नियोजन आयोग बरखास्त करून नीती आयोगाची स्थापना केली, ही मोदी सरकारची सर्वांत मोठी चुक होती. नियोजन आयोग बरखास्त केल्यामुळे देशातील 640 जिल्ह्यांचे नियोजन बिघडले आहे, असा आरोप मुणगेकर यांनी केला.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप व एनडीएला बहुमताचा आकडा पार करता येणार नाहीत आणि देशात राजकीय परिवर्तन घडून इंडिया आघाडी सरकार येईल. इंडिया आघाडीचे सरकार आल्यास मोदी सरकारने सर्वच वस्तूंवर लावलेला जीएसटी रद्द करेल व काँग्रेसच्या न्यायपत्र (जाहीरनाम्या)मध्ये दिलेली आश्‍वासनांची पूर्तता करणार आहे, असे त्यांनी सांगितले. भाजपने महाराष्ट्रात अत्यंत खालच्यास्तराचे राजकारण करून शिवसेना व राष्ट्रवादी फोडून भाजप सत्तेला आला. भाजपच्या राजकीय प्रयोग त्यांच्या पक्षातील काही मंडळींना आवडला नाही. 2024 विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दारूण पराभव होऊन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल, असा दावा मुणगेकर यांनी केला.

You cannot copy content of this page