माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची मागणी:राज्य शासनाने आर्थिक तरतूद करण्याचीही केली मागणी..
⚡सावंतवाडी ता.२७-: महाराष्ट्र वीज वितरण कंपनीने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हा 31 केवी 11 केवी गावा गावातील विद्युत लाईन अंडरग्राउंड केबल टाकून जोडाव्यात. यासाठी खास बाब म्हणून महाराष्ट्र सरकारने याची संपूर्ण तरतूद करावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली.
दरम्यान विद्युत वितरणच्या बेजबाबदार कारभारामुळे तसेच हम करे से कायदा, ही गुर्मी असल्यामुळे आम्हाला विचारणारा कोणीच नाही अशी मनवृत्ती विजवितरणच्या अधिकाऱ्यांची झालेली आहे, असा आरोप देखील माजी नगराध्यक्ष श्री साळगावकर यांनी यावेळी केला.
ते म्हणाले, बांदा येथे काल विद्युत वाहिनी खाली पडल्यामुळे महिला दगावली, असे अनेक अपघात झालेले आहेत. वीज वितरणच्या अधिकाऱ्याना याचे गांभीर्य नाही. तसेच तळकोकणात सिंधुदुर्ग- रत्नागिरी, रायगड निसर्ग संपन्न आहेत. यातील बायोडायव्हर्सिटी जगप्रसिद्ध आहे. एका बाजूने आपण झाडे लावा वृक्ष जगवा घोषणा करत असतो. त्यामुळे ही वनराई जपण्यासाठी लाईट सप्लाय साठी असलेले केबल्स अंडरग्राउंड करणे आवश्यक आहे असेही श्री. साळगावकर यांनी पत्रकात म्हटले आहे.
