⚡कणकवली ता.२१-: तालुक्यात गुरुवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा हरकुळ बु. व हळवल गावाला बसला होता. परिणामी याठिकाणच्या अनेक घरांची पडझड झाली होती. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी मंगळवारी आमदार नीतेश राणे यांनी केली. पाहणीदरम्यान राणेंनी आपद्गस्त कुटुंबांची भेट घेतली. या आपद्गस्तांना तातडीची मदत म्हणून कौले व पत्रे व अन्य साहित्य पाठवून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.
यावेळी माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी सभापती बुलंद पटेल, बाबा वर्देकर, माजी उपसरपंच राजू पेडणेकर, चंद्रकांत परब, इम्रान शेख, अनिल खोचरे, आबा खोचरे, बडेमिया शेख, गणेश घाडीगावकर, प्रमोद घाडीगावकर, समद शेख, सईद शेखयांच्यासह स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. तहसीलदार दीक्षांत देशपांडे,महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. हरकुळ बु. गावातील शेखवाडी व खडकवाडी येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या सर्व नुकसानीची राणे यांनी आधिकऱ्यांसोबत पाहाणी केली.
राणे म्हणाले, तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे जे काही नुकसान झालेलं त्याचे प्रशासन व वीज महावितरण विभागाच्या माध्यमातून जे काही पंचनामे केले. त्या सर्व नुकसानाचा आढावा घेतला. भाजपच्या माध्यमातून आम्ही तातडीची मदत उपलब्ध करून दिली आहे. प्रामुख्याने तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी जे काही सहकाऱ्यांसमवेत कार्यप्रणाली राबवून पंचनामे केले. त्याप्रमाणे नुकसान भरपाईची जी काही मागणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्य सरकारकडे केलेली आहे. त्याचा पाठपुरावा करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, यांच्यासोबत चर्चा करून झालेलं नुकसान विशेष बाब म्हणून जास्तीत जास्त नुकसान भरपाई लोकांना कशी मिळवून देता येईल यासाठी याकरिता आम्ही पाऊले टाकणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
