प्रंचड गर्मी असल्याने दुपारचा वीजपुरवठा खंडीत करु नये…

मंदार नाईक: विज बिल उशिरा भरल्यास ग्राहकांना त्रास देणारा अधिकाऱ्यांना उन्हाळ्याचा ग्राहकांची दया येत नाही का..?

⚡सावंतवाडी ता.१७-: सध्या प्रचंड गर्मी सुरू असून ऐन दुपारच्या वेळी विज पुरवठाही बंद करण्यात येत आहे. परिणामी, आजारी व्यक्तींना तसेच ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, महावितरण लोकांच्या आरोग्याशी खेळत असून दुपारच्या वेळेस विद्युत पुरवठा सुरळीत सुरू ठेवावा. अन्यथा उन्हाचा त्रास सामान्य जनतेला काय होतो हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ असा इशारा सामाजिक कार्यकर्ते तथा माजी आमदार जीजी उपरकर यांचे समर्थक मंदार नाईक यांनी प्रशासनाला दिला आहे.

  सावंतवाडी तालुक्यात मागील दोन महिन्यांपासून सतत विजेचा खेळखंडोबा चालू आहे. तर दुसरीकडे प्रशासनाकडून मागील काही महिने दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत नागरिकांनी बाहेर न पडण्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि याच दरम्यान विज पुरवठा खंडीत केला जात आहे. सध्याचे उष्णतेचे प्रमाण पहाता हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. या वाढलेल्या गर्मीवर पंखा वापरणे हा एकमेव उपाय सर्वसामान्य जनतेकडे आहे आणि असे असताना विज पुरवठा खंडीत केला जात आहे. याबाबत विद्युत महावितरण अधिका-यांना विचारले असता पावसाच्या कामांची पूर्वतयारी चालू असल्याचे सांगून टाळाटाळ करीत आहे. दरम्यान, विज बिल उशिरा भरल्यास ग्राहकांना त्रास देणा-या अधिका-यांना उन्हाळ्यात ग्राहकांची दया येत नाही का? जे अधिकारी वातानुकुलीत कार्यालयात बसून दिवस घालविण्याचे काम व महावितरणाचा गलेलठ्ठ पगार घेण्याचे काम करतात त्या अधिका-यांना सामान्य जनेतेची व्यथा कशी समजणार? जर पावसाळ्याचे काम आता सुरू करत असाल तर या आधी झोपला होता काय? असे प्रश्नही श्री.नाईक यांनी उपस्थित केले आहेत. आता विज पुरवठा खंडीत करून महावितरण जर पावसाळ्याची पूर्व तयारी करत असेल तर पावसाळ्यात सुद्धा अशीच बोंब असते. त्यामुळे आता महावितरणने वेळीच गोष्टीला आवर घालून दुपारच्या वेळेस विज पुरवठा सुरळीत ठेवावा. पावसाळ्यात सुद्धा ग्राहकांना योग्य ती सेवा द्यावी. उगाच सेवा न देता वसुलीचा तगादा लावू नये. अन्यथा जनतेला होणारा त्रास काय असतो हे तुम्हाला आम्ही दाखवून देऊ अशा इशाराही मंदार नाईक यांनी दिली आहे.
You cannot copy content of this page