मिथुन मालंडकर:मागण्या मान्य करा
मालवण दि प्रतिनिधी एलईडी व पर्ससीन मासेमारी विरोधात मालवण येथील मत्स्य व्यवसायच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयासमोर पारंपरिक मच्छीमारांनी सुरू केलेले बेमुदत साखळी उपोषण आंदोलन होळी सणामुळे शनिवारपासून काही कालावधीसाठी स्थगित केले. तसे पत्र आंदोलनाच्या पंधराव्या दिवशी शुक्रवारी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे जिल्हाध्यक्ष मिथुन मालंडकर यांनी मत्स्य विभागाला सादर केले. आंदोलन स्थगित करतानाच आमच्या मागण्यांवर आम्ही ठाम असून त्यांची पूर्तता न झाल्यास पूर्वसूचना न देताच समुद्रात आंदोलन छेडू असा इशारा यावेळी मच्छीमारांनी दिला. बंदी कालावधी असतानाही समुद्रात सुरू असलेल्या एलईडी पर्ससीन मासेमारीवर मत्स्य विभागाकडून कारवाई होत नसल्याच्या विरोधात अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या वतीने समितीचे जिल्हाध्यक्ष मिथुन मालंडकर यांच्या नेतृत्वाखाली पारंपारिक मच्छीमारांनी साखळी उपोषण आंदोलन छेडले. गेले पंधरा दिवस हे आंदोलन सुरू होते. मात्र होळी सणाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन शनिवार पासून स्थगित करण्यात आले. शुक्रवारी आंदोलनाच्या पंधराव्या दिवशी मिथुन मालंडकर यांच्यासह उपाध्यक्ष भाऊ मोरजे, अखिल महाराष्ट्र महिला मच्छीमार कृती समिती जिल्हाध्यक्षा स्वप्नाली तारी आदींनी सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर, श्रुतिका गावडे, अस्लेषा गोळवणकर, परवाना अधिकारी मुरारी भालेकर यांची भेट घेऊन त्यांना पत्र सादर केले. शनिवारी सुट्टीचा दिवस असल्याने त्यामुळे तुमचा खोळंबा नको, असे सांगत मालंडकर यांनी मत्स्य विभागाकडे पत्र सादर केले आणि मत्स्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना होळीच्या शुभेच्छाही दिल्या. दरम्यान, काही कालावधीसाठी का होईना मच्छीमारांनी आंदोलन स्थगित केल्याने मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास घेतला. मात्र, पंधरा दिवस साखळी उपोषण करूनही मत्स्य विभागाच्या वरिष्ठ आणि स्थानिक कार्यालयाकडून योग्य ती दखल घेण्यात आलेली नाही. आमच्या मागणीनुसार आम्हाला लवकरात लवकर वरिष्ठ कार्यालयाकडून पत्र द्यावे. अवैध पर्ससीन मासेमारी करणाऱ्या नौकांवर कारवाई करावी, या आमच्या मागण्यांवर आम्ही ठाम आहोत. मागण्या पूर्ण न झाल्यास प्रशासनास कोणतीही पूर्वसूचना न देता, आम्ही आपल्या कार्यालयासमोर किंवा समुद्रात बेमुदत उपोषण छेडू, असा इशारा मालंडकर यांनी दिला आहे. पारंपरिक मच्छीमारांच्या पंधरा दिवसांच्या आंदोलनात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसे आदी प्रमुख पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी जाऊन मच्छीमारांचे म्हणणे जाणून घेतले. परंतु मत्स्य विभागाकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलन पंधरा दिवस सुरू होते. मात्र होळी सणामुळे हे आंदोलन स्थगित झाले असून मच्छीमारांच्या पुढील भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे.
