तिलारी मार्गावरील कठडे बनताहेत इंजिनिअरिंगचे अजब नमुने..
⚡दोडामार्ग ता.२५-:
दोडामार्ग तिलारी मार्गावरील काही धोकादायक ठिकाणी सध्या संरक्षक कठडे (मोऱ्या) बांधण्याचे काम सुरू आहे; मात्र हे काम करणाऱ्या इंजिनिअर आणि त्यांच्या कामगारांनी कमाल केली आहे.विशेष म्हणजे चुकीचे काम होऊनही त्याकडे दुर्लक्ष करून बांधकामने धमाल उडवून दिली आहे.दोडामार्गहून तिलारीकडे जाताना डाव्या बाजूला आंबेली गावात जाणाऱ्या प्रवेश द्वारासमोर बांधण्यात आलेला सिमेंट काँक्रिटचा कठडा चक्क एका बाजूने दीड फूट जमिनीत खचला होता.याचा अर्थ सरळ आहे संबंधित ठेकेदाराने कथड्याचे बांधकाम वरवर केले आहे.अंदाजपत्रकात जमिनीखाली जेवढे फूट सिमेंट काँक्रिट चे बांधकाम करायला हवे तेवढे केलेले नाही.त्यामुळे कठडा खचला आहे.विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी,सुपरवायझर किंवा ठेकेदाराने त्याकडे लक्ष दिलेले नाही.तिथे उपस्थित असलेल्या मुकादमाला त्याबाबत विचारले असता त्याने कठडा एका बाजूने दीड फूट खचल्याचे मान्य केले.तेवढा भाग काँक्रिट टाकून वरून समतल करून घेतला की झाले असा उपायही त्याने सांगितला आणि तसे केलेही.हा सगळा प्रकार बांधकाम विभाग आणि इंजिनियर यांची कमाल अधोरेखित करणारच म्हणावा लागेल.
पैसे वाचवण्यासाठी चुकीचे काम
मोरीचे संरक्षक कठडे बांधताना जमिनीखालीही काही फूट काँक्रिट घालावे लागते; पण काही ठेकेदार पैसे वाचवण्यासाठी अंदाजपत्रकाप्रमाणे काम करत नाहीत.त्यांना बांधकाम च्या अधिकाऱ्यांचा पाठिंबा असतो.त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि असे प्रकार घडतात.